पुण्याच्या प्रेमीयुगुलाची यवतमाळमध्ये आत्महत्या
By Admin | Updated: October 16, 2014 05:03 IST2014-10-16T05:03:52+5:302014-10-16T05:03:52+5:30
येथील स्मशानभूमीत बुधवारी पुण्याच्या प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.

पुण्याच्या प्रेमीयुगुलाची यवतमाळमध्ये आत्महत्या
महागाव (यवतमाळ) : येथील स्मशानभूमीत बुधवारी पुण्याच्या प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.
जयश्री दीपक भोंगाडे (३१ रा. खुरपुडी ता. खेड) आणि एकनाथ तुकाराम चौधरी (४२ रा. निमगाव ता. खेड) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघे मजुरी करत होते.
दोघेही विवाहित असून जयश्रीला तीन मुले तर एकनाथला दोन अपत्ये आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दोघेही महागाव तालुक्यातील काळीटेंभी परिसरात एका वाहनाने संशयास्पदरित्या फिरत होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी महागाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलाविले. दोघेही विवाहित आणि सज्ञान असल्याने चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्याबद्दल माहिती दिली.
मंगळवारी रात्री दोघांनीही महागाव येथील स्मशानभूमी गाठली. रात्री तेथे दोघांनीही विष प्राशन केले. बुधवारी सकाळी काही नागरिकांंना स्मशानभूमीत हे दोघे अत्यवस्थ आढळून आले. त्यापैकी एकनाथ यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर अत्यवस्थ स्थितीत जयश्री यांना सवना येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्याकडील वाहन ताब्यात घेतले आहे.
शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह पुण्याकडे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे दोघेही मोलमजुरी करणारे असून दिग्रस तालुक्यातील विठोली येथील मजुरांच्या ओळखीने ते या परिसरात आले होते. गावकऱ्यांनी पोलिसांना तसेच नातेवाईकांना माहिती दिल्याने आपली बदनामी होईल या भीतीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)