वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या
By Admin | Updated: June 10, 2016 08:03 IST2016-06-10T05:27:13+5:302016-06-10T08:03:24+5:30
वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली.

वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या
मुंबई : वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली.
मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली, ज्यात त्याने वडिलांची माफी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर शेख असे या त्याचे नाव आहे. तो जोगेशवरीच्या बेहरामबाग परिसरात राहत होता.
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, शेखला दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी सिगारेट ओढताना पाहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता.
जोगेशवरीच्या ओरिएंट महाविद्यालयात शिकणाऱ्या शेखने दुपारी दीड वाजता लेक्चर संपल्यानंतर मित्रांना पुढे जाण्यास सांगितले.
मित्रांनी त्याला सोबत येण्यास सांगितले तेव्हा ‘धिस इज माय लास्ट डे फ्रेंड्स’ असे तो मित्रांना म्हणाला. त्यानंतर क्लासरूमचा दरवाजा बंद करून त्याने खिडकीतून खाली उडी मारली. त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
त्याच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने ‘सॉरी डॅड! आय वॉज इन बॅड कंपनी’, अशा शब्दांत वडिलांची माफी मागितल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)