औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीस कंटाळून नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी जीवन संपविले.माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथील बाळासाहेब गोविंद राठोड (३७) या शेतकऱ्याने बँक व खासगी सावकाराच्या कर्जास कंटाळून मंगळवारी दुपारी शेतात विषप्राशन केले. राठोड यांच्या मुलीचे २० आॅगस्टला लग्न झाले होते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांदोबा जरीबा वाघमारे (५५, राक़बनूर) यांनी सोमवारी आत्महत्या केली. परभणी तालुक्यातील पोरवड येथील प्रयागबाई नंदकुमार गिराम (४०) या महिलेने दुबार पेरणी करुनही पीक हातचे गेल्याने सोमवारी रात्री विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविली. सेलू तालुक्यातील शिराळा येथील श्यामा दगडोबा झांजे (२२) हा तरुण वडिलांवरील कर्ज कसे फेडायेचे, या विवंचनेत होता. त्यातून त्याने २८ आॅगस्टला शेतात विषप्राशन केले होते. परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चार शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Updated: September 2, 2015 01:10 IST