बीड जिल्ह्यात चोवीस तासात तीन शेतक-यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: August 20, 2016 12:40 IST2016-08-20T12:40:25+5:302016-08-20T12:40:25+5:30
जिल्ह्यात चोवीस तासात तीन शेतक-यांनी आत्महत्या केली असून आत्महत्या सत्र अजूनही सुरुच असल्याचे दिसत आहे

बीड जिल्ह्यात चोवीस तासात तीन शेतक-यांच्या आत्महत्या
>- ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 20 - जिल्ह्यात चोवीस तासात तीन शेतक-यांनी आत्महत्या केली असून आत्महत्या सत्र अजूनही सुरुच असल्याचे दिसत आहे. मृतांत बीड तालुक्यातील दोन तर परळी तालुक्यातील एका शेतक-याचा समावेश आहे.
अनंत तांदळे (वय ४९, रा. अंबिलवडगाव ता. बीड) या शेतक-याकडे नेकनूर येथील हैद्राबाद बँकेचे कर्ज होते. पुर्नगठण करुन बँकेने त्यांच्याकडून ९२ हजार ८०० रुपये भरुन घेतले. मात्र, पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ केली. हेलपाटे मारुन थकलेल्या अनंत यांनी शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुसरी घटना बीड तालुक्यातील तळेगावात घडली. महादेव ज्ञानदेव घोलप (५५) या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. दोन्ही घटनांची जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद केली आहे.
तिस-या घटनेत परळी तालुक्यातील पौळपिंप्री येथील विश्वंभर बालासाहेब पारेकर (४२) या शेतक-याने शुक्रवारी रात्री विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे खासगी सावकाराचे कर्ज होते. चार मुलींची लग्ने कशी करायची? या चिंतेनेही त्यांना ग्रासले होते. त्यामुळे विश्वंभर हे निराश होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. याप्रकरणी उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात नोंद झाली नव्हती.