जवानाची सिमला येथे गोळी झाडून आत्महत्या
By Admin | Updated: September 18, 2015 00:42 IST2015-09-17T23:13:32+5:302015-09-18T00:42:18+5:30
अकोला जिल्ह्यातील सौंदळा येथील जवानाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अज्ञात.

जवानाची सिमला येथे गोळी झाडून आत्महत्या
अकोला : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सेवारत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील नितीन गजाननराव गोतमारे या २४ वर्षे वयाच्या जवानाने सिमला येथे मुख्यालयात १६ सप्टेंबरच्या रात्री बंदुकीतून स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. त्यांचे पार्थिव १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विमानाने नागपूर येथे पोहोचणार आहे.दरम्यान,नितीनच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सौंदळा येथील शेतकरी कुटुंबातील नितीनच्या वडिलांकडे तीन एकर शेती आहे. नितीनने बारावीपयर्ंत शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षापूर्वी तो इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात भरती झाला होता. त्याने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आयटीबीपीच्या सिमलास्थित तारादेवी मुख्यालयात बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नितीनच्या आत्महत्येची बातमी सौंदळा येथे कळताच गावात शोककळा पसरली. गावातील व्यावसायिक व व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी विमानाने नागपूरला पोहोचल्यानंतर तेथून ते सौंदळा येथे आणले जाणार आहे. यासंदर्भात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे असिस्टंट कमांडर विक्रमसिंग यांनी आत्महत्येसंदर्भात सिमलामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून, या आत्महत्येची चौकशी सुरू असल्याचे सांगीतले. या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.