जन्मठेपेच्या कैद्याची कारागृहात आत्महत्या
By Admin | Updated: June 13, 2014 01:24 IST2014-06-13T01:24:47+5:302014-06-13T01:24:47+5:30
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या तरूण कैद्याने गुरूवारी दुपारी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, कारागृह

जन्मठेपेच्या कैद्याची कारागृहात आत्महत्या
पत्नीच्या खुनाचा होता आरोप : सहा दिवसांपूर्वीच आला होता चंद्रपूरच्या कारागृहात
चंद्रपूर : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या तरूण कैद्याने गुरूवारी दुपारी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, कारागृह अधिक्षकांच्या केबिनलगतच त्याने ही आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुकेश बिरबल रजाक असे या कैद्याचे नाव असून तो २७ वर्षे वयाचा होता. पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला ७ जूनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून त्याची रवानगी चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. वर्तणूक चांगली असल्याने त्याला कार्यालयातील कामाची जबाबदारी देण्यात आली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गुरूवारी दुपारी कारागृहातील बहुतेक शिपाई मध्यान्ह भोजनासाठी गेले असता शुकशुकाट बघून मुकेशने काळ्या रंगाच्या दुपट्याने गळफास तयार लावून आत्महत्या केली. दुपारी २.४५ वाजता कामावर परतलेल्या शिपायांना तो फासावर लटकलेला आढळला. मृत मुकेश हा मुळचा मध्यप्रदेशातील मुराना या गावचा असून येथील धारिवाल कंपनीमध्ये कामाला होता. वडगाव पोलीस चौकीमागे तो आपली पत्नी भुरी हिच्यासह राहात होता. त्याला चार, तीन आणि पाऊणे दोन वर्षांची तीन अपत्येही आहेत. २४ आॅगस्ट २०१२ रोजी त्याच्या पत्नीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुकेश आणि घरकाम करणाऱ्या महिलेवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. यात अलिकडेच ७ जूनला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयाने मुकेशला आरोपी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर सहआरोपी महिलेची निर्दोष मुक्तता केली. या गुन्हाची शिक्षा भोगण्यासाठी त्याला येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निर्णयावर वरच्या न्यायालयात अपिल करण्यासाठी त्याचा भाऊ आणि अन्य नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून कागदपत्रांची जुळवावजुळव करीत होते. आवश्यक कागदपत्रे जमल्याचे सांगण्यासाठी दुपारनंतर त्याचा भाऊ कारागृहात भेटीसाठी गेला, मात्र तिथे त्याला मुकेशच्या आत्महत्येची वार्ता कळली. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. घटना उघडकीस आल्यावर कारागृहाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी राजू भुजबळ आदींनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)