छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: August 21, 2015 00:50 IST2015-08-21T00:46:44+5:302015-08-21T00:50:09+5:30
एका तरुणाकडून सुरू असलेले सततचे अश्लील एसएमएस, फोन अन् धमक्यांनी त्रस्त होऊन विषारी गोळ्या घेऊन एका २३ वर्षीय मुलीने आत्महत्या केली

छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या
औरंगाबाद : एका तरुणाकडून सुरू असलेले सततचे अश्लील एसएमएस, फोन अन् धमक्यांनी त्रस्त होऊन विषारी गोळ्या घेऊन एका २३ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. त्या तरुणाबरोबरच सिडको ठाण्याचे पोलीसही तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
अत्यंत शांत आणि हुशार असलेल्या श्रुती अशोक कुलकर्णी हिने आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. तेथेच तिची ओळख स्वप्नील संतोष मिणियार (२३) याच्यासोबत झाली. आयटीआयमध्ये मन न रमल्याने तिने अकरावीसाठी एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, एकतर्फी प्रेमात पडलेला स्वप्नील सतत तिचा पाठलाग करू लागला. अनेकदा त्याने प्रेमाचा प्रस्तावही मांडला. मात्र, श्रुतीने त्याला प्रत्येकवेळी नकार दिला.तिने एमबीएसाठी प्रवेश घेतल्यानंतरही तो महाविद्यालयात जाऊन तिला अडवीत असे. सतत अश्लील फोन करणे, एसएमएस करणे असे प्रकार त्याने सुरू केले होते. ‘माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला जगू देणार नाही, तुझ्या बहिणीला, आजी- आजोबांना जिवे मारीन,’ अशा धमक्या तो देत होता.
सततच्या त्रासाला वैतागलेल्या श्रुतीने २४ जुलै रोजी सिडको पोलीस ठाणे गाठले आणि स्वप्नीलविरुद्ध अशी फिर्याद दिली होती.