रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
By Admin | Updated: May 26, 2014 02:39 IST2014-05-26T02:39:33+5:302014-05-26T02:39:33+5:30
प्रियंकाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये सहकारी विद्यार्थिनीकडून झालेल्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी प्रियंका नयन मुखर्जी (वय-१९) हिने शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. प्रियंकाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये सहकारी विद्यार्थिनीकडून झालेल्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. पश्चिम बंगालमधील डॉ. नयन मुखर्जी यांची मुलगी प्रियंका हिने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या परिसरातील वसतिगृहात प्रियंका राहत होती. तिच्या रूममध्ये प्रियंका पवार, स्नेहल महाजन, प्रिया काबरा या तीन विद्यार्थिनी राहत होत्या. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रियंका हिने रुममधील तिन्ही सहकारी मैत्रिणींना आपण थोडा वेळ आराम करतो, असे सांगितले. त्यानंतर तिन्ही मैत्रिणी वरच्या मजल्यावर अभ्यासाला निघून गेल्या. रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास झाल्यानंतर स्नेहल आपल्या रुमकडे आली. आतमध्ये झोपलेल्या प्रियंकाला बराच वेळ आवाज दिल्यानंतरही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर स्नेहलसह अन्य दोन्ही मैत्रिणी वसतिगृह अधीक्षिका अर्चना भिरूड यांच्याकडे आल्या. वसतिगृहाजवळील दोन सुरक्षारक्षकांना सोबत घेत भिरूड या रुमजवळ आल्या. सुरक्षारक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्या वेळी समोर पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रियंकाचा मृतदेह लटकलेला होता.