पर्यवेक्षकाला मारहाण करून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:39 IST2018-04-25T00:39:01+5:302018-04-25T00:39:01+5:30
काबरा महाविद्यालयात ‘अप्लाईड स्टॅटिस्टिक्स इन फिजिकल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस्’ या विषयाची परीक्षा सकाळी १० ते १ या वेळेत सुरू होती.

पर्यवेक्षकाला मारहाण करून आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिसऱ्यांदा कॉपी पकडताच त्या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या कानशिलात लगावली आणि तात्काळ हॉलबाहेर येत तिसºया मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. काबरा महाविद्यालयात ‘अप्लाईड स्टॅटिस्टिक्स इन फिजिकल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस्’ या विषयाची परीक्षा सकाळी १० ते १ या वेळेत सुरू होती. ‘एमपीसीसी २०१’ या परीक्षा क्रमांकाचा विद्यार्थी हॉल क्रमांक ४० मध्ये परीक्षा देत होता. या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोन वेळा कॉपी पकडली. दोन्ही वेळा त्याला समज देऊन सोडण्यात आले. याच विद्यार्थ्याची १२ वाजून ६ मिनिटाला तिसºयांदा कॉपी पकडली. तेव्हा त्याने थेट पर्यवेक्षक सुहास गिरी यांच्या गालावर चापट लगावली तसेच झटक्यात हॉलबाहेर धाव घेऊन तिसºया मजल्यावरून खाली उडी मारण्यासाठी कठड्यावर चढला. पर्यवेक्षकासह इतर परीक्षार्थींनी त्याला पकडल्याने अनर्थ टळला. प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी क्रांतीचौक पोलिसांत तक्रार दिली आहे.