आरोपीची कोठडीत आत्महत्या
By Admin | Updated: May 3, 2016 03:01 IST2016-05-03T03:01:02+5:302016-05-03T03:01:02+5:30
घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलुंड पोलीस ठाण्याच्या कोठडीत शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. अमित राठोड (२०) असे

आरोपीची कोठडीत आत्महत्या
मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलुंड पोलीस ठाण्याच्या कोठडीत शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. अमित राठोड (२०) असे मृत आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
केशवपाडा येथील रहिवासी असलेल्या राठोडला २९ एप्रिल रोजी घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. न्यायालयाने त्याला ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जातो असे सांगून राठोड तेथील शौचालयात गेला. शौचालयातील खिडकीच्या ग्रीलला शर्टाच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.
आपला आवाज कुणापर्यंत पोहचू नये म्हणून आत्महत्येपूर्वी त्याने शौचालयातील पाण्याचा नळ सुरु ठेवला होता. त्याच्यासह या कोठडीत तीन कैदी होते. कोठडीच्या बाहेर पोलीस हवालदार पहारा देत असतात. बराच वेळ झाला तरी नळ सुरु असल्यामुळे तेथील हवालदाराला संशय आला. शौचायलायचे दार उघडले असता राठोड गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला साडेतीनच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील स्वप्ननगरी परीसरातील सरला नायर यांच्या घरातून त्याने सव्वा पाच लाखांची रोकड लंपास केली. नायर यांच्याकडे राठोडची पत्नी मोलकरीण म्हणून काम करायची. त्यामुळे घरात रोख रक्कम असल्याची माहिती राठोडला मिळाली. त्याने संधी साधून घरातील पैशांवर हात साफ केला होता. मात्र तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये राठोडचा प्रताप कैद होताच त्याला मुलुंड पोलिसांनी अटक केली.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली. (प्रतिनिधी)
गुन्हे शाखेकडून तपास सुरू
राठोडच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हे
शाखा अधिक शोध घेत आहे.
मुलुंड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अग्रवाल रुग्णालय आहे. अशा वेळी त्यांच्या ही बाब कधी लक्षात आली? तेथील पोलीस कोठे होते? याचा शोध सुरु आहे.
संबंधित पोलीस हवालदार, अधिकारी यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली.
अंगावर जखमा नाहीत
राठोडच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असताना त्याचा मृतदेहावर कुठल्याही जखमा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. केवळ गळ्याभोवती गळफासाचे व्रण आहेत. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यातून यामागचे नेमके कारण समोर येईल असेही सुर्वे यांनी सांगितले.