विद्युत कायद्यात सुधारणा सुचवू
By Admin | Updated: January 30, 2015 05:17 IST2015-01-30T05:17:00+5:302015-01-30T05:17:00+5:30
विद्युत अधिनियम २००३मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत ग्राहकहित डोळ्यांसमोर ठेवून लवकरात

विद्युत कायद्यात सुधारणा सुचवू
मुंबई : विद्युत अधिनियम २००३मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत ग्राहकहित डोळ्यांसमोर ठेवून लवकरात लवकर राज्य शासनाकडून सूचना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विद्युत अधिनियम २००३मधील सुधारणांबाबत राज्याची भूमिका समजावून घेण्यासाठी खासदार किरीट सोमय्या यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली; त्या वेळी बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. विद्युत सुधारणा बिल २०१४च्या अनुषंगाने अभ्यास करून संसदेला अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोमय्या यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर अभ्यास करून किमान वेळेत राज्याची भूमिका केंद्राकडे स्पष्ट केली जावी, असेही निर्देश बावनकुळे यांनी बैठकीदरम्यान प्रधान सचिव ऊर्जा आणि तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले.
याप्रसंगी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय
संचालक बिपीन श्रीमाळी आणि महापारेषणचे संचालक राजीव कुमार मित्तल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बावनकुळे यांनी या वेळी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावाही घेतला आणि कालबद्ध मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)