सोलापूरमध्ये साखर कारखान्यांनी विकली ३७७ कोटींची वीज
By Admin | Updated: November 11, 2016 16:22 IST2016-11-11T16:22:23+5:302016-11-11T16:22:23+5:30
देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याने सन २०१५-१६ या वर्षात तब्बल ३७७ कोटी ७३ लाखांची वीज तयार करुन महावितरणला विकली आहे.

सोलापूरमध्ये साखर कारखान्यांनी विकली ३७७ कोटींची वीज
>ऑनलाइन लोकमत/शिवाजी सुरवसे
सोलापूर, दि. 11 - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याने सन २०१५-१६ या वर्षात तब्बल ३७७ कोटी ७३ लाखांची वीज तयार करुन महावितरणला विकली आहे. जिल्ह्यात ३५ कारखान्यांपैकी काही कारखाने बंद असून २१ कारखान्यांनी तब्बल ६२१ मेगावॅट वीज निर्मिती केली आहे. बहुतांश कारखान्यांनी को-जन प्रकल्प उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती झाली आहे.
जिल्ह्याला दरमहा सरासरी ४४० दशलक्ष युनिट एवढी वीज लागते़, ती खरेदी करण्यासाठी सुमारे २४० कोटी रुपये खर्च होतात. यातून १०० कोटी रुपयेच वीज बीलातून वसूल होत असून शेतीपंपांची थकबाकी तब्बल १७७७ कोटी रुपये असून ही राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी यांनी सांगितले. साखर कारखान्यांनी वीज केली की आम्ही विकत घेतो त्यांचे पैसे देखील लगेच दिले जातात. आम्हाला मात्र शेतक-यांच्या शेतीपंपांचे थकीत वीज बील मिळत नाही, त्यामुळे यावर काही तरी उपाय काढले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यातील कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर वीज तयार होते शिवाय केंद्र शासनाच्या योजनेतून नऊ खासगी सौरऊर्जा प्रकल्प तयार झाले असून त्यांनी ८६ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे़. हे खासगी प्रकल्प आमचेच वीज ग्राहक घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही यापुढे सौरऊर्जा प्रकल्पांना परवानगी देणार नसल्याचे यावेळी औंढेकर म्हणाले.