बाग वाचविण्यासाठी शेतक-याची अशीही धडपड
By Admin | Updated: June 8, 2016 02:13 IST2016-06-08T02:13:41+5:302016-06-08T02:13:41+5:30
डाळिंबाच्या झाडाला बांधल्या ४0 हजारांच्या साड्या.

बाग वाचविण्यासाठी शेतक-याची अशीही धडपड
अमोल ठाकरे/संग्रामपूर (जि. बुलडाणा)
ग्रामीण भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे. आपले हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी वरवट बकाल येथील शेतकर्याने डाळिंबाच्या झाडांना साड्या बांधून बागेचे संरक्षण करण्याचा एक अनोखा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे या शेतकर्याचा आदर्श फळबाग करणार्या शेतकर्यांच्या गावागावांत पोहोचत आहे.
वरवट बकाल येथील शेतकरी तुळशीराम जगन्नाथ गांधी यांनी आपल्या पाच एकर शेतात पाच वर्षांंपूर्वी डाळिंबाची लागवड केलीे. दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा जास्त तापल्याने सर्वसामान्यांसह फळपिकांनासुद्धा याचा फटका बसत होता. यावर एक नामी शक्कल गांधी यांना सुचली. त्यांनी शेतात लागवड केलेल्या १ हजार २00 झाडांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सुमारे दोन हजार साड्यांनी गुंडाळून घेतले. यासाठी त्यांना ४0 हजार रुपये खर्च करावा लागला. याबाबत त्यांनी सांगितले की, वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाच्या बागेत लागलेल्या फळांना बसू नये तसेच पक्ष्यांचा उपद्रव कमी व्हावा या दृष्टीने काही उपाय करता येईल का, याबाबत विचार करीत होतो. नेटशेड खर्चीक पर्याय होता. त्यामुळे सहज करता येणारा उपाय म्हणून झाडांना साड्या गुंडाळल्या. परिणामी कमी खर्चात पिकाचे संरक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष्यांचा उपद्रव झाला कमी
डाळिंबाच्या झाडांना साड्या गुंडाळल्यामुळे उन्हापासून फळांचे व झाडांचे संरक्षण तर होतच आहे, शिवाय ज्या वेळेला शेतातून वारा वाहतो, त्यामुळे या झाडांवरील साड्यांद्वारे एक वेगळाच ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे कुठलाही पक्षी या डाळिंबाच्या बागेकडे फिरकत नाही. पक्ष्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे फळांचे नुकसानही टळले आहे.