हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By Admin | Updated: March 6, 2017 02:14 IST2017-03-06T02:14:56+5:302017-03-06T02:14:56+5:30

हृदयाने विमानतळ ते रुग्णालयापर्यंतचा प्रवास केवळ सहा मिनिटांत करून एका ५० वर्षीय महिलेला जीवनदान दिले.

Successful heart transplant surgery | हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी


पुणे : सोलापूर येथून विमानाने पुण्यात आणण्यात आलेल्या हृदयाने विमानतळ ते रुग्णालयापर्यंतचा प्रवास केवळ सहा मिनिटांत करून एका ५० वर्षीय महिलेला जीवनदान दिले. पुण्यात रविवारी ही पहिलीच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
फुटबॉल खेळत असताना सोलापूर येथे एक पंधरा वर्षीय खेळाडू मैदानावरच चक्कर येऊन पडला होता. त्याला तेथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना अवयवदानाविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनीही त्यास संमती दर्शविली. रविवारी त्याचे हृदय, दोन मूत्रपिंड आणि यकृताचे दान करण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे पुण्यातील तीन व सोलापूर येथील एका रुग्णाला जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार पुण्यात विमानाने हृदय आणण्यात आले. रुबी हॉल रुग्णालयात एका ५० वर्षीय महिलेवर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महिला दोन महिन्यांपासून हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत होती.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने सोलापूर येथून विमानाने पुण्यात हृदय आणले. वाहतूक पोलिसांनी विमानतळ ते रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरीडॉर केला होता. त्यानुसार आठ किलोमीटरचे हे अंतर केवळ सहा मिनिटांत पार करण्यात आले. सव्वासहा वाजता विमानतळावरून रुग्णवाहिका निघाल्यानंतर ६ वाजून २१ मिनिटांनी रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया सुरू करून प्रत्यारोपण करण्यात आले. डॉ. आशिष खनिजो आणि डॉ. मनोज दुराईराज यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पैलकर व सुमारे ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
मुलाचे एक मूत्रपिंड सोलापूरमधील गरजू रुग्णाला देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड पुण्यातील नोबल रुग्णालयात तर यकृताचे मंगेशकर रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
>पुण्यात याआधी हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे पुण्यातील विविध रुग्णालयांतून २०१५ पासून १० हृदय मुंबई, दिल्ली, चेन्नई या शहरांमध्ये पाठविण्यात आली. तिथे संबंधित रुग्णांवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रुबी हॉल रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

Web Title: Successful heart transplant surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.