हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: September 7, 2015 01:44 IST2015-09-07T01:44:41+5:302015-09-07T01:44:41+5:30
भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी सहभागी साधू, संन्याशांचे वर्तन व त्यांच्या ‘लीलां’मुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वादग्रस्त बनू लागला आहे.

हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करा
जमीर काझी, मुंबई
भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी सहभागी साधू, संन्याशांचे वर्तन व त्यांच्या ‘लीलां’मुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वादग्रस्त बनू लागला आहे. सध्या साधुग्राममध्ये मध्यरात्रीपर्यंत मिरवणुका काढून हुल्लडबाजी करणाऱ्या आखाड्यांना प्रतिबंध न केल्यास हिंसक घटना घडू शकते़ त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याची सूचना असणारा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) नाशिक पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या शाहीस्नानावेळी मध्यरात्री तीनपर्यंत आखाड्यांच्या मिरवणुका सुरू होत्या़ त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे या अहवालात नमूद केले आहे. मिरवणुकांतील सहभागी दोन आखाड्यांतील साधू व भक्तांमध्येच वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत होण्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाने वर्तविली आहे. त्याबाबत स्थानिक पोलिसांनी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे एसआयडीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
दर १२ वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला यंदा १४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. देशभरातील वैष्णव व शैव पंथीय साधंूच्या आखाड्यांनी साधुग्राम तुडुंब भरले आहे. पहिल्या पर्वणीला किमान ६० ते ८० लाखांवर भक्त येण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली. नाशिक पोलिसांच्या पथकांबरोबरच राज्य गुप्तवार्ता विभागातील विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक कुंभमेळ्यातील सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. २९ आॅगस्टला झालेल्या पहिल्या शाहीस्नानावेळी आखाड्यांनी काढलेल्या मिरवणुकांमुळे काहीसे गोंधळाचे वातावरण होते.
कुंभमेळ्यामध्ये १३ सप्टेंबरला दुसरे शाहीस्नान होईल. १८ व २५ सप्टेंबरला अनुक्रमे तिसरे शाही व वामन द्वादशी स्नान होणार आहे. यावेळी आखाड्यांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यावेळी साधू व त्यांच्या भक्तांतील संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, असे सुचविण्यात आल्याचे एसआयडीतील विशेष महानिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
कुंभमेळ्यातील आखाडे : वैष्णव पंथीय आखाडे (नाशिक), निर्मोही अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा, दिगंबर अनी आखाडा, शैव पंथीय आखाडे (त्र्यंबकेश्वर), शंभू पंच दशनाम जुना आखाडा, शंभू पंच दशनाम आवाहन आखाडा, पंचाग्नी आखाडा, तपोनिधी निरंजनी आखाडा, तपोनिधी आनंद आखाडा, पंचायती आखाडा महानिर्वाणी, पंचायती आठल आखाडा, बडा उदासीन आखाडा निर्वाण, नया उदासीन आखाडा निर्वाण व पंचायती निर्मल आखाडा