वेळ आल्यावर ब्लू प्रिंट सादर करु - राज ठाकरे
By Admin | Updated: August 17, 2014 16:31 IST2014-08-17T16:31:21+5:302014-08-17T16:31:21+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन. त्यावर सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेऊ नका असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

वेळ आल्यावर ब्लू प्रिंट सादर करु - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १७ - सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. हल्ली प्रसारमाध्यम वॉट्स अॅपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
ठाण्यात मिक्ता २०१४ या नाट्य आणि चित्रपट महोत्सवाचे रविवारी राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी राज ठाकरेंनी मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी भाष्य केले. मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार याची सध्या प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ब्लू प्रिंटच्या प्रकाशनाला रतन टाटा, मुकेश अंबानी येतील हे मलादेखील माहित नव्हते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला . आमची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेनच असे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदींवर सोशल मीडियावर टीका सुरु झाल्याच्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी भलताच अर्थ काढला असा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडिया हे माध्यमप्रभावी असले तरी ते आता डोकेदुखी ठरु लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी सोशल मीडियापासून थोडं लांब राहायला हवे असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून मनसेची राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडू असे राज ठाकरे सांगत आहेत. मात्र अद्याप ही ब्लू प्रिंट प्रकाशित करण्यात आली नसून यावरुन राज ठाकरेंवर वारंवार टीका होत आली आहे.