भूविकास बँकांच्या मालमत्ताची विक्री होणार, सुभाष देशमुख यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 14:42 IST2017-05-04T14:42:43+5:302017-05-04T14:42:43+5:30

-

Subhash Deshmukh's information about the sale of land development banks | भूविकास बँकांच्या मालमत्ताची विक्री होणार, सुभाष देशमुख यांची माहिती

भूविकास बँकांच्या मालमत्ताची विक्री होणार, सुभाष देशमुख यांची माहिती


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : भूविकास बँकेच्या राज्यभरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागीच ६० मालमत्ता असून त्यांची विक्री करण्याचा तसेच शेतकऱ्यांकडील थकीत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना दिली़

आ़ चंद्रदीप तरके यांनी विधिमंडळात भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम आणि अन्य प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले होते़ गेल्या ४० महिन्यांपासून बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते़ थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवून थकीत ९४६ कोटी कर्जापैकी ७१६ कोटींची सूट देण्यात आली़ उर्वरित रक्कम २३३ कोटी शेतकऱ्यांनी बँकेला परतफेड करणे अपेक्षित होते़ दोन वर्षात ही रक्कम शेतकऱ्यांनी परत केलीच नाही. त्यामुळे ही थकीत रक्कम माफ करण्याचा विचार पुढे आला़ मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यावर निर्णय होईल, असे सहकारमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले़

भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त झालेल्या तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सुमारे २७० कोटी रूपये रक्कम देय आहे़ शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करून कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा विचार होता, परंतु ही वसुलीच होत नसल्याने देणी थकीत राहिली आहेत़ कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ त्या मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नेते खा़ आनंदराव अडसूळ यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले़
----------------------------
जागा विक्री प्रक्रिया सुरू

भूविकास बँकेच्या मालकीच्या राज्यात विविध ठिकाणी ६० मालमत्ता आहेत़ या मालमत्तांची विक्री करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़ काही ठिकाणी स्थगिती आहे़ जागा विक्रीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम देण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़

----------------------------

जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव

राज्यातील ११ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यास असमर्थ आहेत़ कोणत्याही स्थितीत खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न असला तरी अडचणीतील बँकांचा त्याला प्रतिसाद नाही़ सोलापूर, नाशिकसह राज्यातील ९ जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़

------------------------

आठ दिवसात होईल तूरखरेदी

राज्यातील तुरीचे उत्पादन वाढल्याने यंदा तूर खरेदीचा विषय चर्चेत आल्याचे सांगताना पणनमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, यापूर्वी तुरीचे एकरी सरासरी उत्पादन ६ ते ७ क्विंटल होते़ यंदा उत्तम हवामान, पाऊस चांगला झाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे़ तुरीचे खोडवा पीक प्रथमच शेतकऱ्यांनी घेतले़ त्याचेही उत्पादन सध्या विक्रीसाठी बाजारात येत असल्याने नियोजन काहीअंशी विस्कळीत झाल्याची कबुली त्यांनी दिली़ राज्यात १० लाख क्विंटल तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे़ आठवड्यात खरेदी प्रक्रिया मार्गी लागेल, असे स्पष्ट केले़ यापूर्वी २ लाख ३१ हजार क्विंटल तूर खरेदीचा उच्चांक होता़ १५ मार्चनंतर तूर खरेदी झाली नाही़ यंदा ४१ लाख क्विंटल तूर खरेदी होऊनही शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असल्याचे दिसून आले आहे़

---------------------------

बाजार समित्या पारदर्शक

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत़ व्यापाऱ्यांकडून बोगस खरेदी पावत्या देण्याचे प्रकारही घडतात़ त्यावर पणन खात्याचे नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ लवकरच या बाजार समित्यांचे व्यवहार आॅनलाइन करून त्यात पारदर्शकता आणली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली़

Web Title: Subhash Deshmukh's information about the sale of land development banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.