करणीच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 11, 2014 01:09 IST2014-09-11T01:09:33+5:302014-09-11T01:09:33+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना

करणीच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या
भालेगाव बाजार : एका महिलेने करणी केली आहे, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, त्यामुळे मी जीवनयात्रा संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बुलडाणा जिलतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बुधवारी आत्महत्या केली. अंधविश्वासाचा पगडा ग्रामीण भागात अद्यापही किती प्रमाणात आहे, याचे प्रत्यंतर या घटनेतून आले आहे.
खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील अमोल गजानन हिवरकार या विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी १२ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृतकाच्या खिशात चिठ्ठी आढळली. एका महिलेने करणी केल्यामुळे अभ्यास लक्षात राहत नाही, त्यामुळे मी जीवनयात्रा संपवित आहे, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. अमोल खामगाव येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. त्याचे आई-वडिल शेतमजुरी करतात. बुधवारी ते शेतात कामाला गेले असता, अमोलने घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.