विद्यार्थिनींनी जाणून घेतल्या ‘त्यांच्या’ व्यथा
By Admin | Updated: March 11, 2015 00:08 IST2015-03-10T23:36:46+5:302015-03-11T00:08:17+5:30
स्वच्छता मोहीम : वेश्या वस्तीत राबविले राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिर

विद्यार्थिनींनी जाणून घेतल्या ‘त्यांच्या’ व्यथा
सांगली : येथील दसरा चौकातील सुंदरनगरमधील वेश्या महिलांच्या घरोघरी जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून त्यांच्या घरासमोर रांगोळ्याही काढल्या. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (सांगलीवाडी) व राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिराचे येथील सुंदरनगरमधील वेश्या वस्तीत आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरापासून सुमारे अडीचशे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या महिलांच्या घरात जाऊन त्यांच्या आरोग्याच्या, आर्थिक व कौटुंबिक समस्या जाणून घेतल्या. त्याच्या निराकरणासाठी उपाययोजनाही सुचवल्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. या परिसराची स्वच्छता करून प्रत्येक घरासमोर सुबक रांगोळ्याही विद्यार्थिनींनी काढल्या. यावेळी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थिनींनी सुमारे पाच तास श्रमदानही केले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणेम्हणून महापौर विवेक कांबळे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, शिक्षणाधिकारी नीशा वाघमोडे, नगरसेविका अनारकली कुरणे, ज्योती अदाटे उपस्थित होते.
वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख (बंदव्वा) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्वांनी वेश्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वस्तीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा, साफसफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी वैभव चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तेरा मुलांना दिले माझे नाव : विवेक कांबळे
यावेळी महापौर कांबळे म्हणाले की, या महिलांच्या समस्या आपण सर्वात जवळून अनुभवल्या आहेत. घरातून बाहेर काढल्यानंतर याच वस्तीत आपण वाढलो. या महिलांच्या मुलांना पित्याचे नाव नसल्यामुळे समाजात वावरताना त्यांना खूप अवहेलना सहन कराव्या लागतात. यामुळे आजपर्यंत आपण अशा तेरा मुलांना आपले नाव दिले आहे. आज ही तेराही मुले उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, याचा आपल्याला अभिमान आहे.