बोर अभयारण्यात विद्यार्थ्यांची पायी भ्रमंती!
By Admin | Updated: August 3, 2014 00:54 IST2014-08-03T00:54:14+5:302014-08-03T00:54:14+5:30
केंद्र शासनाने बोर अभयारण्याला नुकताच राज्यातील सहाव्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. यामुळे आपोआपच प्रकल्पाचे सर्व नियम, कायदे येथे लागू पडतात; पण बोरच्या अधिकाऱ्यांनी हेच कायदे पायदळी

बोर अभयारण्यात विद्यार्थ्यांची पायी भ्रमंती!
गंभीर प्रकार : व्याघ्रदिनी अधिकाऱ्यांनीच नियम पायदळी तुडविले
प्रफूल्ल लुंगे - सेलू(जि.वर्धा)
केंद्र शासनाने बोर अभयारण्याला नुकताच राज्यातील सहाव्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. यामुळे आपोआपच प्रकल्पाचे सर्व नियम, कायदे येथे लागू पडतात; पण बोरच्या अधिकाऱ्यांनी हेच कायदे पायदळी तुडविले़ व्याघ्र दिनी या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांनी चक्क पायी भ्रमंती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे़
गेल्या मंगळवारी प्रकल्पाच्या सभागृहात चवथ्या जागतिक व्याघ्र दिनाचा विशेष कार्यक्रम पार पडला़ या कार्यक्रमात शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. ‘वाघ वाचवा’ विषयावर निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळविल्याने शाळेतील विद्यार्थीही कार्यक्रमाला हजर होते़ काही संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर ही मंडळी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंतीवर निघाली. वाहनाऐवजी जंगलाच्या आत दोन किमीपेक्षा अधिक अंतर सर्वजण पायी फिरुन आले. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. वाघ वा हिंस्त्र प्राणी कधीही हल्ला करू शकतात. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत याचेही भानही कुणाला राहिले नाही. विशेष म्हणजे १ आॅक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद असते. जेव्हा सफारी सुरू असते, तेव्हाही सुरक्षित वाहनातून ती करावी लागते असे व्याघ्र प्रकल्पाचे नियम सांगतात.पायी भ्रमंतीमध्ये बोरचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, माहिती अधिकारी अनिल गडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनर, न्यू बोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे सावंत, वर्धा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा समावेश होता.