३0 महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती
By Admin | Updated: July 31, 2014 04:39 IST2014-07-31T04:39:29+5:302014-07-31T04:39:29+5:30
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी नुकतीच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली

३0 महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी नुकतीच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील ३0 नामवंत महाविद्यालयांना सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी सोमय्या महाविद्यालयाला पसंती दिली आहे.
विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी आाणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे नोंदणी केली होती. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सुमारे साडे सातशे महाविद्यालयांपैकी मुंबईतील ३0 महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ लागली होती. विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विद्याविहार येथील एस. के. सोमय्या आणि के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयाला पसंती दिली आहे. एस. के. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ६ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर के. जे. सोमय्या महाविद्यालयात ५ हजार
१९३ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली
आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयाला सर्वाधिक पसंती मिळाली. ५ हजार २२ विद्यार्थ्यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला. तर
कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात ३
हजार ४३0 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)