शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तारांबळ
By Admin | Updated: August 11, 2014 23:07 IST2014-08-11T22:52:52+5:302014-08-11T23:07:09+5:30
ऑनलाईन प्रक्रिया खोळंबली : अर्ज भरण्याची अंतीम मुदत १६ ऑगस्ट

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तारांबळ
मेहकर: शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने शाळा व महाविद्यालयांमधुन विद्यार्थ्यांंना भरावा लागतो मात्र विद्यार्थ्यांना सदर अर्ज भरण्यासाठी बाहेरील ई-संकेतस्थळ केंद्रावर पाठविले जात आहे. ही ऑनलाईन पद्धत विस्कळीत झाल्याने सध्या विद्यार्थ्यांंची तारांबळ उडत आहे.
समाजकल्याण विभागाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांंसाठी शिष्यवृत्तीची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात आलेली आहे. सन २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातून १७ लाख ४५ हजार ४४९ विद्यार्थ्यांंनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले होते. तर सन २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे ऑनलाईन सुरू असून, अर्ज भरण्याची अंतीम मुदत १६ ऑगस्ट आहे. सदरचे अर्ज संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीच्या संकेत स्थळावरून भरून गटशिक्षणाधिकार्यांकडे जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. शाळेतच शिष्यवृत्तीचे अर्ज भरून देण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, महाविद्यालय आणि शाळांकडून याकडे दुर्लक्ष होत असून, विद्यार्थ्यांंना बाहेरील ई-संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास पाठविले जात आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जामध्ये बर्याच त्रुट्या निघत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्जातील चुकांमुळे विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीपासून वंचीतही राहावे लागू शकते. दरम्यान शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची ऑनलाईन सेवा गत दोन दिवसांपासून विस्कळीत झाली असून, अर्ज भरण्याची अंतीम मुदत जवळ येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांंसह पालकांचीही तारांबळ उडत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तत्काळ सुरळीत झाली नाही, तर शिष्यवृत्तीपासून बरेच विद्यार्थी वंचित राहण्याची भिती परिसरात निर्माण झाली आहे.
** शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अवाजवी शुल्क
विद्यार्थ्यांंचे शिष्यवृत्तीचे अर्ज आपल्या शाळा, महाविद्यालयातूनच भरावे असे आदेश समाज कल्याण विभागाकडून सर्व शाळा, महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. परंतु, काही शिक्षक समाज कल्याणच्या या आदेशाची अमंलबजावणी न करता विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी बाहेरील ई-संकेतस्थळावर पाठवित आहेत. तेथे विद्यार्थ्यांंकडून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी प्रति ४0 ते ५0 रूपये असे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंना नाहक भुर्दंंंड बसत आहे.