विद्यार्थी रमले गोकुळाष्टमी महोत्सवात
By Admin | Updated: August 25, 2016 02:39 IST2016-08-25T02:39:06+5:302016-08-25T02:39:06+5:30
शहरातील बहुतांश सर्व शाळांमध्ये बुधवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

विद्यार्थी रमले गोकुळाष्टमी महोत्सवात
नवी मुंबई : शहरातील बहुतांश सर्व शाळांमध्ये बुधवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. बाळकृष्णाचा पेहराव करण्याची स्पर्धाही आयोजित केली होती. पारंपरिक पद्धतीने हंडी फोडून हा उत्सव साजरा करण्यात आला.
शहरात दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. गोविंदा पथकामधील तरूणांचा रात्री उशिरापर्यंत सराव सुरू होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हंडी बांधण्यासाठी व मैदाने स्वच्छ करण्यास सुरवात केली होती. गतवर्षी शहरात ८९ मंडळांनी दहीहंडी साजरी केली होती. यावर्षी न्यायालयाने अनेक निर्बंध घातल्याने काही मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. पोलिसांनी उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व दहीहंडी उत्सवाच्या परिसरामध्येही कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
गुरूवारी दहीहंडी उत्सव होत असला तरी शाळांमध्ये तो बुधवारीच उत्साहात साजरा केला. कर्णबधिर, गतिमंद व इतर विशेष मुलांच्या शाळांमध्येही दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील वातावरण कृष्णमय झाले होते.