एसटीची २२२ आगारे तोट्यात
By Admin | Updated: July 6, 2014 00:41 IST2014-07-06T00:41:39+5:302014-07-06T00:41:39+5:30
एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायमच आहे. महामंडाळाच्या २४९ पैकी २२२ आगारे आर्थिक तोट्यातून मार्गक्रमण करीत आहेत.

एसटीची २२२ आगारे तोट्यात
दररोज दोन कोटींचा फटका : परिवहन महामंडळ आर्थिक संकटात
अकोला : एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायमच आहे. महामंडाळाच्या २४९ पैकी २२२ आगारे आर्थिक तोट्यातून मार्गक्रमण करीत आहेत. त्यापैकी ५८ आगारे तर दहा वर्षांपासून सातत्याने तोट्यात असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत महामंडळाला दरदिवशी दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील विविध गावांना जोडण्याचे काम एसटीमुळेच शक्य झाले आहे. १९४८ साली सुरु झालेली एसटी आज खेड्यापाड्यात जाऊन पोहोचली आहे. एसटीकडून सध्या सर्वसाधारण, परिवर्तन, हिरकणी, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध, शितल या विशेष गाड्या, तसेच सिटी बसही चालविण्यात येतात.
आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय एसटीकडे अन्य पर्याय नाही. गत आर्थिक वर्षात एसटीवर डिझेल दरवाढीमुळे ४८ कोटींचा, तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे १०० कोटींचा भार पडला. ही तूट भरुन काढण्यासाठी एसटीने १ जूनपासून २.४८ टक्के भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीतून १०० कोटींचे उत्पन्न महामंडळाला अपेक्षित असले, तरी ६८ कोटींची तूट कायमच राहणार आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे प्रवासी भाडे कमी असल्याने, महामंडळावर आर्थिक बोजा पडत असल्याचे मत महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. परिणामी, एसटीच्या आगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत एसटीच्या २४९ पैकी २२२ आगारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नाईलाज म्हणून काही आगार बंद करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले़ काही आगारे बीओटी तत्त्वावर चालविण्याची तयारीही केली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)'