एसटीची प्रवास सवलत ‘आधार’ सक्तीत अडकली
By Admin | Updated: March 25, 2015 02:03 IST2015-03-25T02:03:16+5:302015-03-25T02:03:16+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणारी सवलत आधार कार्डाच्या सक्तीत अडकली आहे.
एसटीची प्रवास सवलत ‘आधार’ सक्तीत अडकली
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणारी सवलत आधार कार्डाच्या सक्तीत अडकली आहे. मात्र महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बोलण्यास असमर्थता दर्शवित राज्य शासनाकडे बोट दाखविले आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी प्रवासादरम्यान ‘आधार’सक्ती करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला अनेक दिवस उलटल्यानंतरही त्याचे अधिकृत आदेश महामंडळाला मिळालेले नाहीत. मात्र रावते यांच्या घोषणेनंतर राज्यात एस.टी. बसमधील अनेक वाहक सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अपंगांना आधार कार्ड दाखविण्याची सक्ती करीत आहेत. आधार कार्ड नसल्याने त्यांच्याकडून तिकिटाचे पूर्ण पैसे घेतले जात आहेत.
ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राज्य शासनाकडून तिकीट दरात सवलत दिली जाते. त्यासाठी तहसीलदारांमार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र मागील काही वर्षांत बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत झाल्या. त्यातून लाखो बोगस प्रमाणपत्रांचे वाटप झाले. त्यामुळे एस.टी.सह राज्य सरकारलाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी महामंडळाने निवडणूक ओळखपत्र किंवा वयाचा कोणताही पुरावा वाहकाला दाखविणे आवश्यक केले. मात्र सध्या केवळ ‘आधार’ची सक्ती केली जात आहे.
महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आधार’सक्तीबाबतचा आदेश राज्य शासनच काढू शकते. महामंडळ असा आदेश काढू शकत नाही. ज्येष्ठांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडेही आल्या आहेत. अनेक बोगस प्रमाणपत्रे सापडली असून, अशा टोळ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जात आहे. तरीही आधारची सक्ती करणे चुकीचे आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा. (प्रतिनिधी)