संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
By Admin | Updated: August 17, 2016 21:21 IST2016-08-17T21:21:38+5:302016-08-17T21:21:38+5:30
पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले.

संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 17 - अपघात प्रकरणातील चालकावर गुन्हा दाखल करण्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाईकांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.
खाडगाव (ता. लातूर) येथील मरिबा राघू मगर (५४) हे सायकलवरुन लातूरच्या दिशेने १४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास येत असताना, भरधाव टेम्पो (एम.एच. २४ बी ६१०२) च्या चालकाने त्यांना धडक दिली. यात मरिबा मगर हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नसल्याने, संतप्त नातेवाईकांनी चालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी अर्जही दिला होता. मात्र गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करुन घेण्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली.
पोलिस ठाण्यात घोषणाबाजी...
मृत मरिबा राघू मगर यांच्या संतप्त नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घोषणाबाजी आणि हालगीनाद करत घटनेचा निषेध नोंदविला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी अपघातातील टेम्पो आणि चालकाला १५ मिनिटात अटक केली. याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.