विधवांच्या सौभाग्यासाठी धडपड

By Admin | Updated: September 26, 2014 13:38 IST2014-09-26T13:38:28+5:302014-09-26T13:38:50+5:30

डोईवर पाटी घेऊन दारोदार भाजी विकता-विकता सुशिक्षितांशी झालेल्या नित्याच्या संवादातून मनावर वाचनाचे संस्कार रुजले.

The struggle for the welfare of widows | विधवांच्या सौभाग्यासाठी धडपड

विधवांच्या सौभाग्यासाठी धडपड

दुसरी माळ - प्रेरणादायिनी : पोटाला चिमटा घेऊन अंगीकारले समाजसेवेचे व्रत
 
अहमदनगर : डोईवर पाटी घेऊन दारोदार भाजी विकता-विकता सुशिक्षितांशी झालेल्या नित्याच्या संवादातून मनावर वाचनाचे संस्कार रुजले. एक-एक करीत तब्बल दोन हजार पुस्तके वाचली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेत, आर्थिक अडचणींशी सामना करीत समाजातील उपेक्षित स्त्रियांसाठी काम करण्याचे ठरवले. विधवांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्या कपाळी कुंकू लावले. आता तर विधवांचे पुनर्विवाह लावून त्यांच्या जीवनात खरेखुरे सौभाग्य परतले आहे. त्यासाठी नगरच्या भाजीविक्रेत्या बेबीताई गायकवाड यांचा नवा संघर्ष प्रेरणादायी आहे.
बेबीताईया मूळच्या शेवगाव तालुक्यातील दहिगावनेच्या. गावामध्ये सार्वजनिक नळावर आधी पाटील पाणी भरायचे आणि सर्वांत शेवटी मागासवर्गीयांनासंधी मिळायची. हा भेदभाव त्यांना खटकला होता. इथेच त्यांच्या सामाजिक जाणिवेचा पाया रचला गेला. मात्र त्याला मूर्त रूप मिळत नव्हते. नगरच्या अशोक गायकवाड या तरुणाशी त्यांचा विवाह जमला. ते एम.आय.डी.सी.मध्ये नोकरीला होते. एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत नोकरीला गेले आणि ती कंपनीही बंद पडली. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी संसाराचे ओझे बेबीताईंनी अंगावर पेलले. 
डोक्यावर पाटी (टोपली) घेऊन त्या भाजी विकू लागल्या. नगरचा सुशिक्षित समाज राहत असलेल्या सावेडीमध्ये त्या भाजी विकायच्या. या वेळी त्यांचा प्राध्यापक, डॉक्टर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क झाला. त्यांच्या मोठेपणाचे गुपित त्या भाजी विकता-विकता जाणून घ्यायच्या. त्यांच्या मोठेपणाचे सूत्र वाचनामध्ये असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनीही वाचनाचं वेड लावून घेतलं. अखंड वाचनामुळे आतापर्यंत तब्बल दोन हजार पुस्तके त्यांनी वाचून काढली. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या त्या पाईक बनल्या. वाचता-वाचता त्या लिहू लागल्या. कविता करू लागल्या. वाचनामुळे त्यांच्यात कमालीचे परिवर्तन झाले. साहित्य वर्तुळात बेबीताईंचा एक वेगळाच दबदबा निर्माण झाला. कविता, लेखनामध्ये स्त्रीवाद हाच त्यांच्या चिंतनाचा आत्मा राहिलेला आहे. 
विधवांचे बोडखे कपाळ त्यांच्या डोक्यात नेहमी सलायचे. वैधव्य आल्याने त्यांच्या वाट्याला आलेलं उपेक्षित जीवन, परंपरेचा पगडा त्यांना असह्य होत होता. विशेषत: सणावाराच्या दिवशी विधवा घराच्या कोपर्‍यात फेकल्या जायच्या. त्यामुळे त्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी विधवांच्या कपाळी कुंकू लावण्याचा उपक्रम हाती घेतला. २0१३मध्ये त्यांच्या या उपक्रमात २५ महिला, ८ वीरपत्नी सहभागी झाल्या. जानेवारी-२0१४च्या मकरसंक्रांतीला तब्बल ९५ विधवा महिला 'हळदी-कुंकू'समारंभात सहभागी झाल्या होत्या. विधवांच्या कुटुंबातील सासूंनीही बेबीताईंच्या उपक्रमाला सहकार्य केले. विधवांना वाण दिले. त्यामुळे त्यांच्या जीवनात सौभाग्याचे क्षण परत मिळाले. केवळ कुंकू लावून भागणार नाही तर त्यांच्या जीवनात पुन्हा कुंकवाचा धनी मिळाला पाहिजे, यासाठी बेबीताईंनी पुढाकार घेतला. 
बेबीताईंनी क्रांतिज्योती महिला मंडळ स्थापन केले आहे. कोणाकडे हात पसरण्यापेक्षा स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे.
(प्रतिनिधी) नगरमध्ये एका महिलेला विवाहानंतर चार-पाच महिन्यांनी वैधव्य आले, तर एका महिलेला प्रसूतीची चाहूल लागलेली असताना तिच्या पतीचा मृत्यू झाला. या दोन्हीही महिला बेबीताईंच्या 'हळदी-कुंकू'ला हजर होत्या. त्यांच्या जीवनात पुन्हा सौभाग्य आणण्यासाठी बेबीताईंनी पुढाकार घेतला. त्या दोघींच्या सासर आणि माहेरच्या नातेवाइकांशी त्या बोलल्या. एका महिलेचा लहान दिराशी, तर दुसर्‍या महिलेचा एका चांगल्या नोकरदार मुलाशी विवाह लावला. विधवांच्या पुनर्विवाहाची ही चळवळ बेबीताईंनी नगरमध्ये रुजवली आहे. त्यांच्यामुळे विधवांना मान, प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांच्या या समाजकार्याला पतीची साथ आहे. स्वत:चा कोलमडलेला संसार उभा करून पतीच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आता त्या विधवांचे संसार फुलवित आहेत. खर्‍या अर्थाने बेबीताई या नवराज्ञीच आहेत. 
 

 

Web Title: The struggle for the welfare of widows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.