ऊस दरावरून होणारा संघर्ष दुर्दैवी
By Admin | Updated: November 13, 2014 00:02 IST2014-11-12T23:38:25+5:302014-11-13T00:02:50+5:30
वसंत भोसले : राजारामबापू कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

ऊस दरावरून होणारा संघर्ष दुर्दैवी
इस्लामपूर : ऊस दरावरून शेतकरी आणि साखर कारखानदार नायक-खलनायकाच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे ऊस दरावरून होणारा संघर्ष दुर्दैवी असून, सहकार चळवळ आणि कारखानदारीच्या हितासाठी कारखानदार व शेतकऱ्यांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे. साखर कारखानदारीतील सहकाराचे द्रष्टेपण जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू उद्योग समूहाने आदर्शपणे जोपासले आहे, असे गौरवोद्गार ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी आज (बुधवारी) काढले.
राजारामबापू कारखान्याच्या साखराळे (ता. वाळवा) येथील मुख्य शाखेच्या ४५ व्या आणि वाटेगाव-सुरुल शाखेच्या १२ व्या गळीत हंगामाची सुरुवात भोसले यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत भोसले बोलत होते. ज्येष्ठ नेते रामराव देशमुख अध्यक्षस्थानी होते.
भोसले म्हणाले की, जयंत पाटील यांचे नेतृत्व लांब पल्ल्याचे आहे, हे त्यांच्या पदार्पणातील काही दिवसातच स्पष्ट झाले. त्याची प्रचिती आज येत आहे. सध्याची साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. देश-राज्यात सत्तांतर झाले आहे. अशावेळी सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. उसाचा उत्पादन खर्च, उसापासून साखर निर्मितीचा उत्पादन खर्च, उपपदार्थ निर्मितीचा खर्च याचा ताळमेळ बसला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल.
ते म्हणाले की, राजारामबापू कारखान्याने आर्थिक शिस्त पाळून काम केल्याने तो प्रगतीपथावर आहे. त्यांनी केलेला शाखाविस्तार कौतुकास्पद आहे. शासनाने तोट्यातील साखर कारखाने ‘राजारामबापू’सारख्या चांगल्या कारखान्यांकडे देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, बाजारात साखरेचे दर कमी होत आहेत. साखर विकूनही बँकेचे कर्ज भागत नाही. काही कारखाने शॉर्ट मार्जीनमध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीला केंद्र व राज्य शासनाने मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी. साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी व जत शाखेत एकूण २५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
संचालक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले, डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपाध्यक्ष विजय पाटील, जनार्दनकाका पाटील, विष्णुपंत शिंदे, जे. वाय. पाटील, प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील, देवराज पाटील, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सभापती रवींद्र बर्डे, सुहासकाका पाटील, सौ. सुश्मिता जाधव, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, पद्मावती पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
साखराळे (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाची सुरुवात बुधवारी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी पी. आर. पाटील, रामराव देशमुख, जनार्दनकाका पाटील, विजय पाटील उपस्थित होते.