सुदृढ जिल्हा बँका करणार शेजारच्या जिल्ह्यात कर्जवाटप
By Admin | Updated: September 8, 2015 01:30 IST2015-09-08T01:30:20+5:302015-09-08T01:30:20+5:30
राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा

सुदृढ जिल्हा बँका करणार शेजारच्या जिल्ह्यात कर्जवाटप
मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांना अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत अशा जिल्ह्यांत व्यावसायिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावे याकरिता प्रयत्न करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांनी खरीप हंगामाचे कर्ज शेतकऱ्यांना दिलेले नाही. उस्मानाबाद बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के तर यवतमाळ बँकेने ५० टक्के कर्ज दिले आहे. याखेरीज अन्य काही बँकांनी कर्जपुरवठ्याचे निकष पूर्ण केले असले तरी सततच्या दुष्काळामुळे कर्ज वसुलीअभावी त्यांचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या समस्येतून मार्ग काढण्याकरिता रिझर्व्ह बँकेला विनंती केली आहे, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
खरिपाच्या हंगामात ३२ हजार २४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप १५ आॅगस्ट २०१५पर्यंत झाले होते. जिल्हा बँकांनी ११ हजार ६०८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करावे असे लक्ष्य निश्चित केले होते. त्यापैकी ११ हजार ३८३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेले आहे. यापैकी ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. दरवर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जात होते. यंदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती वाढली ते सप्टेंबर अखेरीस स्पष्ट होईल. (विशेष प्रतिनिधी)