त्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा - सनातन

By Admin | Updated: September 19, 2015 23:55 IST2015-09-19T23:55:34+5:302015-09-19T23:55:34+5:30

सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड याला अटक करुन पोलिसांनी सनातनद्रोह चालू केला आहे. अशा पोलिसांची नावे सनातनने नोंद केली असून ‘साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांना

The strict education of the police is to be done - Sanatan | त्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा - सनातन

त्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा - सनातन

>- सुधीर लंके,  पुणे
सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड याला अटक करुन पोलिसांनी सनातनद्रोह चालू केला आहे. अशा पोलिसांची नावे सनातनने नोंद केली असून ‘साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांना हिंदू राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल’, असा इशारा सनातन प्रभातने दिला आहे. या इशाऱ्याचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सनातन प्रभात दैनिकाच्या संकेतस्थळावर ‘समीर गायकवाड याच्या दोन नातेवाईकांची चौकशी’ असे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. पोलीस कशापद्धतीने समीर व त्याच्या नातेवाईकांचा छळ करत आहेत, याचा तपशील या वृत्तात देण्यात आला आहे. पोलिसांनी १६ सप्टेंबरला गायकवाडला अटक केली. त्याच दिवशी त्याचे दोन मेव्हणे संकेश्वर (जि. बेळगाव) येथून बेपत्ता होते. त्याविषयीची तक्रार संकेश्वर पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. नंतर ही तक्रार पोलीस हेल्पलाईनवर नोंदविण्यात आली. आता मात्र, या दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन चौकशीनंतर सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन पोलिसांची कायदाबाह्य कृती व सनातनद्रोह चालूच असल्याचे अधोरेखित होते, असे या वृत्तात म्हटले आहे. या मजकुराच्या पुढे कंसात संपादकांच्या नावे सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ‘अशा पोलिसांची नावे नोंद केली असून साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांना हिंदू राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल’, असे त्यात म्हटले आहे. कठोर साधनेची शिक्षा म्हणजे काय? याचा अर्थ उलगडत नाही. पोलिसांची नावे नोंद केल्याचाही खास उल्लेख आहे. ही एकप्रकारे धमकीच असल्याचे मानले जात आहे. कर्नाटक पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या कारस्थानात सहभागी असल्याचेही सनातनने या वृत्तात म्हटले आहे. 
 
मुख्यमंत्र्यांच्या मौनाचे समर्थन....
समीर गायकवाड याच्या अटकेप्रकरणी बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मौनावर कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी टीका केली आहे. यावरही सनातनने भाष्य केले आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी बोलावे की बोलू नये हे त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी काय बोलावे व बोलू नये हे ठरविणारे हे कोण’, असे सनातनने म्हटले आहे. 
 
ही तर सनातनची पोलिसांना धमकी....
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘ही सरळसरळ पोलिसांना दिलेली धमकी आहे. सनातनवर बंदी आणण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे; परंतु सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आता सनातनने थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याने पोलिसांनी तातडीने या धमकीची दखल घेऊन असे लिखाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच या संघटनेवरही बंदी घालावी.
 
कायदेतज्ज्ञांकडून कारवाईची मागणी ....
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, ‘पानसरे, दाभोलकर व आम्ही सगळे लोक न्यायाचे राज्य व संविधान मानणारे आहोत. त्यामुळे आम्हाला सनातनवाले शत्रू मानतात. आता पोलीसही त्यांचे शत्रू झाले आहेत. जे लोक कायदा पाळतील त्यांना आम्ही धडा शिकवू. आमच्याविरोधात काही बोलायचे नाही, कारवाई करायची नाही, आम्ही म्हणतो ते गपगुमान ऐकायचे, अशी त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. इतके दिवस ते समाजाला दम देत होते. आता त्यांनी पोलिसांनाच आव्हान व धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून ‘पोलिसांची नावे नोंदविली म्हणजे काय केले व कठोर साधनेची शिक्षा देणार म्हणजे काय?’ याचा कायदेशीर जाब त्यांना न्यायालयात विचारला पाहिजे. 
अ‍ॅड. असीम सरोदे यांनीही सनातनची ही भाषा म्हणजे धमकीचीच असल्याचे मत नोंदविले. सनातन प्रभात हे लोकशाहीविरोधी वागत असून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गैरवापर करीत आहे. दाभोलकर यांच्या निधनानंतर ‘त्यांना मोक्ष मिळाला’ अशा प्रकारचे विकृत लेखन त्यांनी केले. ही सगळी हिंसक व गुन्हेगारी वृत्तीची लक्षणे आहेत. वरील लिखाणात त्यांनी कायदा झुगारून सरकारलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. पोलिसांनी हे मुखपत्र बंद करण्यासाठी कायदेशीर पावले उचलून तातडीने ही कारवाई करावी. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांना या लिखाणाचा अर्थ कळत नाही असे नाही. आता पोलिसांनी निरपेक्षपणे कारवाई करण्याची गरज आहे, असे सरोदे म्हणाले. 
 
धमकी नव्हे चेतावणी म्हणा -  सनातन
‘लोकमत’ने या लिखाणासंदर्भात ‘सनातन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांचे संपादक शशिकांत राणे यांच्याशी गोवा येथे दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध झाले नाहीत. गोवा, सिंधुदुर्ग आवृत्तीचे व्यवस्थापक वीरेंद्र मराठे यांनीच त्यांच्या वतीने भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘तुम्ही या लिखाणाला धमकी असा शब्द वापरू शकत नाही. ही चेतावणी किंवा सूचना असे म्हणू शकता. जे लोक वाईट वागतात त्यांना आमचे पितृत्वाच्या नात्याने हे समजावणे आहे. धमकी लोकांना मारण्यासाठी असते. आम्ही वाईट लोकांना चांगले करणार आहोत.’ पोलिसांना कठोर साधना करायला लावणार म्हणजे काय करणार? असा प्रश्न केला असता, ‘सध्या लोकांना तुरुंगात डांबून काहीच होत नाही. आमची कारागृहे अशी असतील ज्यात वाईट प्रवृत्तीची व्यक्ती चांगली होऊन बाहेर पडेल. पोलीस आमच्याशी चुकीचे वागले म्हणून आम्ही त्यांना सक्तीने साधना करायला लावू’, असे समर्थन त्यांनी केले.

Web Title: The strict education of the police is to be done - Sanatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.