दोन्ही बाबांची शक्ती पणाला
By Admin | Updated: September 25, 2014 23:23 IST2014-09-25T21:33:43+5:302014-09-25T23:23:23+5:30
घमासान सुरू : अतुल भोसलेंचा आज तर मुख्यमंंत्र्यांचा अर्ज उद्या होणार दाखल

दोन्ही बाबांची शक्ती पणाला
प्रमोद सुकरे - कऱ्हाड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दक्षिणेतून उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली; तर याच रात्री त्यांच्या विरोधात बंड केलेले डॉ़ अतुल भोसले मुंबईत ‘भाजप’वासी झाले़ त्यामुळे त्यांचीही उमेदवारी निश्चित आहे़ शुक्रवारी अतुल भोसले, तर शनिवारी पृथ्वीराज चव्हाण शक्तिप्रदर्शनाने आपले अर्ज दाखल करणार आहेत़ या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे़ सुमारे चार वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची अनपेक्षितपणे संधी मिळाली़ त्यानंतर राष्ट्रवादीत असणारे दिवंगत विलासराव देशमुख यांचे जावई डॉ़ अतुल भोसले काँग्रेसमध्ये दाखल झाले़ त्यामुळे कऱ्हाड तालुक्यात काँग्रेसची ताकद अधिक वाढली, अशी स्थिती झाली़ काँग्रेसअंतर्गत गटबाजीत आमदार उंडाळकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री गटाकडून डॉ़ अतुल भोसले यांचेच नाव चर्चेत येऊ लागले़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका होणार म्हटल्यावर ३ ते ४ महिन्यांपासून मुख्यमंत्री चव्हाण यांचेच नाव दक्षिणस्वारीसाठी पुढे आले अन् अतुल भोसले मुख्यमंत्री बाबांच्या गाडीतून उतरले़ बुधवारी ते भाजपच्या गाडीत बसलेही़ त्यामुळे इथली निवडणूक लक्षवेधी होणार, हे निश्चित! शुक्रवारी डॉक्टर बाबांनी तर शनिवारी पृथ्वीराज बाबांनी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त शोधलाय़ त्यांसाठी त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी चालवलीय़ अर्ज दाखल केल्यानंतर दोघांच्याही जाहीर सभा होणार आहेत़ त्यात कोण-कोण काय-काय बोलणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने कऱ्हाड दक्षिणमधून अधिकृत उमेदवारी दिली आहे़ मतदार संघात त्यांनी कोट्यावधींचा विकास निधी दिल्याने सुज्ञ मतदार त्यांच्या पाठिशीच राहतील़ - आमदार अनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस डॉ़ अतुल भोसले यांनी बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे़ शुक्रवारी कऱ्हाड दक्षिणमधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़ भोसलेंच्या प्रवेशाने भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढण्यास मदतच होणार आहे़ - भरत पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप