एसटीपी प्रकल्पाची आज चाचणी होणार
By Admin | Updated: May 8, 2014 12:24 IST2014-05-08T12:24:35+5:302014-05-08T12:24:35+5:30
पहिला टप्पा : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेची तयारी पूर्ण

एसटीपी प्रकल्पाची आज चाचणी होणार
कोल्हापूर : कसबा बावड्यातील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उद्या (गुरुवार) जयंती नाल्यातील सांडपाण्याची चाचणी घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील २४ दशलक्ष सांडपाण्यावर चाचणी घेणार असल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयास सांगितले आहे. कसबा बावडा येथील या प्रक्रिया केंद्रातील विविध तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्या. महावितरणकडून वीजपुरवठा व वीज मिटर मिळविण्याची प्रक्रिया गेली तीन दिवस सुरू आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत महापालिकेने पाण्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा प्रयत्न केल्यानंतर गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष चाचणी घेण्याचे ठरले. केंद्रासाठी अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले आहे. मानवी व स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मैला नष्ट करणार्या जीवाणंूची निर्मिती करून पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढविणारे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सांडपाण्यासाठी १२.५ एमएलडीच्या सहा मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. एकाचवेळी ७६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी इतर कारणांसाठी वापरून उरलेले पाणी नदीत सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी एका टाकीत १२ एलएलडी पाणी साठवले आहे. या पाण्यावर प्रथम प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर जयंती नाल्यातील पाण्यावर चाचणी घेतली जाणार आहे. महापालिकेने याबाबतची सर्व तयारी पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले.