निनावी पत्रावरून रचली खुनाची कहाणी--संजय पाटील खून खटला
By Admin | Updated: September 26, 2014 23:33 IST2014-09-26T22:40:03+5:302014-09-26T23:33:22+5:30
बचाव पक्षाचा युक्तिवाद : पोलिसांनी केला अंधळा तपास, --मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तपासाला गती

निनावी पत्रावरून रचली खुनाची कहाणी--संजय पाटील खून खटला
सातारा : ‘महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून झाल्यानंतर काही दिवसांतच निनावी पत्र आले. त्या पत्राचा आधार घेत पोलिसांनी कहाणी बनवली. पोलिसांनी डोळ्याला झापड लावून हा तपास केल्यामुळे आरोपींना हे भोगायला लागले असून, पोलिसांच्या तपासामध्ये अनेक विसंगती आहेत,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत जाधव यांनी केला.
जिल्हा न्यायालयात शुक्रवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा विसंगत तपास कसा केला, हे अॅड. जाधव यांनी अनेक मुद्द्यातून न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. खून झाल्यानंतर घटनास्थळी चप्पल पडली होती. त्या चप्पलवर मात्र रक्त नव्हते. ते चप्पल कोणाचे आहे, हे पुढे आले नाही. त्यामुळे एक चप्पल मारेकऱ्याचेही असावं. पोलिसांच्या तपासामध्ये संजय पाटील यांना समोरून गोळ्या घातल्या, त्यातील पुंगळ्या त्यांच्या स्कॉपिओ गाडीजवळ पडल्या होत्या, असे नमूद करण्यात आले. मात्र वास्तविक पिस्तुलातील पुंगळ्या दक्षिण बाजूला सापडल्या. काही साक्षीदारांचे म्हणणे आहे, संजय पाटील यांच्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने गोळ्या झाडण्यात आल्या; परंतु समोरून पाच आणि पाठीमागून सहा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काळी मोटारसायकल घटनास्थळी होती, असे म्हणणे आहे. परंतु काही साक्षीदारांनी सांगितले आहे की, त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी उभी होती. या खटल्यातील साक्षीदार वैभव पाटील हा मयत संजय पाटील यांच्या गावचा आहे. घटना घडल्यानंतर तो कृष्णा हॉस्पिटमध्ये गेला होता. काही दिवस तो पुण्यात राहिला होता. ओळख परेडमध्ये त्याने ओळख परेडला आलेले त्याचे मित्रच आहेत, हे त्याने मान्य केले. त्यामुळे पोलिसांनी ओळख परेडचा केवळ फार्स केला. वाळू व्यवसायातून तसेच पवनचक्कीच्या प्रकरणातून खून झाला असावा, असे गृहित धरून पोलिसांचा तपास केला. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तपासाला गती
मयताच्या भावाने निवेदन दिल्यानंतर तसेच निनावी पत्र आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय पाटील यांच्या घरी भेट दिली. त्यानंतरच तपासाला गती मिळाली. या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले. संजय पाटील यांचा खून महाराष्ट्र केसरी म्हणून झाला नसून, अनेक गुन्ह्यातील एका व्यक्तिमत्त्वाचा हा खून आहे, अशी टिप्पणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत जाधव यांनी केली.