कथा एका जिद्दी महिलेची अन् कर्र्तृत्वाची

By Admin | Updated: December 10, 2014 23:53 IST2014-12-10T23:27:01+5:302014-12-10T23:53:11+5:30

‘लोकमत’चे प्रोत्साहन : गीतांजली मुळीक यांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार

The story is about a stubborn woman and her husband | कथा एका जिद्दी महिलेची अन् कर्र्तृत्वाची

कथा एका जिद्दी महिलेची अन् कर्र्तृत्वाची

रविंद्र येसादे - उत्तूर -धाडसी, संयमी, मनमिळावू व स्पर्धा परीक्षेच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील गीतांजली संतोष मुळीक-गरड या धाडसी महिलेने स्त्रियांसमोर वेगळा ठसा निर्माण केला आहे. या कर्तृत्ववान महिलेला ‘लोकमत वुमेन समीट’ या दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे गौरविण्यात आले. ‘लोकमत’च्या दिमाखदार सोहळ्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
बालपणातच खिलाडूवृत्ती जोपासणाऱ्या गीतांजली यांनी
एम. एस्सी. अ‍ॅग्री ही कृषी पदविका प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे धडे गिरविल्याने ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणून महाविद्यालयाने त्यांची निवड केली. यावेळी देशाच्या राजधानीत १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला संचलन करण्यासाठी निवड झाली. ज्युदो खेळात ‘ब्लॅक बेल्ट’ हे पदक मिळाले. कृषी पदविकेनंतर नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च आॅफिसर म्हणून काम करताना डायबेटीस पेशंटच्या आहाराबाबत संशोधन केले.
नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पोलीस निरीक्षकांची परीक्षा पास झाल्यानंतर भरती प्रक्रियेला स्थगिती आली. पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना फौजदारपदाची परीक्षा दिली. त्यातही यश मिळाले. इकडे पोलीस निरीक्षकपदाचा निकाल लागला.
नाशिक येथील प्रशिक्षणात दहा फूट उंच भितींवरून झेप मारणारी पहिली महिला म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षणात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते चार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथे नियुक्ती झाल्यानंतर डॉ. दीपक महाजन यांच्या खुनास वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.
पोलिसांची कामाची पद्धत नेहमी व्यस्त असते. अशातून पुन्हा स्पर्धा परीक्षा देऊन नायब तहसीलदार बनल्या. पोलीस निरीक्षकपदाचा राजीनामा देऊन शिरूर येथे कामास रुजू झाल्या. घरची जबाबदारी सांभाळत आणि सासू-सासरे, पती यांच्या पाठबळावर शिरूर येथे त्यांनी उत्कृष्ठ काम सुरू केले आहे.
शिरूर येथील अवैध बाळू उपसावर बंदी घालून शासनास ५० लाखांचा महसूल जमा करून दिला. वाहनचालकांची दादागिरी मोडून काढली. वाळू माफियांना ‘सळो की पळो’ करून सोडले. माझ्या या साऱ्या कामाचे कौतुक ‘लोकमत’ने केले अन् प्रसिद्धीही मिळाल्याने मी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. सासर अन् माहेरची साथ चांगली मिळाल्याची भावनाही गीतांजली यांनी व्यक्त केली.
गीतांजली यांना सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी, युगांडाच्या उच्चायुक्तएलिझाबेथ नापेथॉक, अभिनेत्री रविना टंडन, ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणेचे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मीलन दर्डा, आदींसह मान्यवरांच्या हस्ते मानपत्राचे वितरण करण्यात आले.


उत्तूरमधील पहिली महिला
पोलीस निरीक्षकापासून नायब तहसीलदार पदापर्यंत वैवाहिक जीवनात मजल मारणारी उत्तूरमधील त्या पहिल्या, तर ‘लोकमत’चा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

Web Title: The story is about a stubborn woman and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.