फडणवीसांचा प्रचारी झंझावात
By Admin | Updated: October 11, 2014 05:44 IST2014-10-11T05:44:33+5:302014-10-11T05:44:33+5:30
नागपूरच्या धंतोलीमधील मेहडिया चौकात भाजपाचे कार्यकर्ते जय्यत तयारीत होते... तेवढ्यात ‘देवेंद्रभाऊ आले’ असे कुणीतरी उच्चरवात बोलले

फडणवीसांचा प्रचारी झंझावात
संदीप प्रधान, मुंबई
नागपूरच्या धंतोलीमधील मेहडिया चौकात भाजपाचे कार्यकर्ते जय्यत तयारीत होते... तेवढ्यात ‘देवेंद्रभाऊ आले’ असे कुणीतरी उच्चरवात बोलले... लागलीच पांगलेल्या कार्यकर्त्यांचे पदयात्रेत रुपांतर झाले... फडणवीसांची पदयात्रा धंतोली तकीया या बैठ्या घरांच्या चिंचोळ््या वस्तीत शिरताच ताशाच्या कडकडाटाने कुत्री भुंकू लागली, देवेंद्र यांचे ‘मास्क’ चढवलेली गुडघ्याएवढी पोरं सैरावैरा पळू लागली, घराघरातून बाया पंचारती घेऊन बाहेर पडू लागल्या, हाततुरे देऊन देवेंद्र यांचे स्वागत होऊ लागले आणि एकच घोषणा घुमली ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो...’
फडणवीस ठिकठिकाणी थांबून त्यांच्या स्वागताचा स्वीकार करीत होते. घाटरोड, रामबाग असा कधी पायी तर कधी उघड्या जीपवरून त्यांनी प्रवास केला. गॅलरीतील परिचिताला हात दाखव, गर्दीतून पुढे आलेल्यांच्या हस्तांदोलनाचा स्वीकार कर असे करीत अखेरीस पदयात्रा संपवून फडणवीस मोटारीत बसले तेव्हा त्यांच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला होता. त्यांनी हलकेच तो पुसला. दररोज कपाळावर मळवट भरल्याने आणि अक्षता दाबून लावल्याने जखम झाली आहे, फडणवीस सांगत होते.
फडणवीसांच्या सहा आसनी विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण केले. रोज पहाटे पाच वाजता झोपतो आणि आठ वाजता उठून प्रचार सुरू करतो. मतदारसंघात दोन तास पदयात्रा केल्यावर राज्याच्या वेगवेगळ््या भागात प्रचार दौरा सुरू होतो. तेवढ्यात पॅकबंद नाश्ता फडणवीसांसमोर आला. प्रचारादरम्यान आहाराची काही पथ्य पाळता का? या प्रश्नावर मोठा घास घेत ‘मिळेल ते खातो,’ असे ते म्हणाले. प्रचारादरम्यान तब्येत राखण्याकरिता काही औषधे घेता का?, असे विचारताच, ‘मी तब्येतीला सांगितले आहे की १५ आॅक्टोबरपर्यंत तू मला साथ दे नंतर मी तुझी काळजी घेईन,’ हे सांगताना फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील प्रचाराचा शिणवटा ठळकपणे दिसत होता.
राजकीय वजन वाढलंय. मघाशी तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणा झाल्या... स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मानत नाही. लोकांचा उत्साह कंट्रोल करावा लागतो, असे ते बोलले. गाणी ऐकण्याचा मला शौक आहे. सध्या त्याकरिता वेळ मिळत नाही. बरीच गाणी पाठ आहेत ती मधेमधे गुणगुणतो, असे ते बोलले.एरव्ही दररोज सर्व पेपर वाचत होतो. आता फक्त अपडेट घेतो, असे ते म्हणाले.
प्रचारात मोदींनी रंगीत कुर्ते परिधान करून नवा ट्रेन्ड आणला. तुमचा चॉईस काय?
काळ््या रंगाच्या पॅन्टवर डार्क शर्ट असेल तर फिकट रंगाचे जाकिट घालतो. आपले कपडे नागपूरच्या गोविंद टेलरकडे गेली २० वर्षे शिवत आलोय, असे त्यांनी सांगितले. पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी सफेद शर्ट बदलून त्यावर निळ््या रंगाचे जाकीट परिधान केले.