पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला आज डोंबिवलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात साडी नेसवल्याची धक्कादायक घटना घडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवलीत काँग्रेसच्या ७२ वर्षांच्या दलित कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांकडून जातीवाचक शिवीगाळ करून अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली, अशा गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डोंबिवलीतील एका ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. तुमच्या जातीचे लोक माजलेत, असे म्हणत धमक्या दिल्या. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. भाजपाच्या या गुंडांवर खून, बलात्कारासारख्या २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने असे विकृत, गुंड, मवाली लोक पाळले आहेत, त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा काँग्रेस त्यांना धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ आश्वासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पुशधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाही, मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे करा अशा सुचना मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.