कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:16 PM2022-04-27T21:16:26+5:302022-04-27T21:17:07+5:30

Uddhav Thackeray : राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Stop the fourth wave of corona on the threshold, Chief Minister Uddhav Thackeray's instructions | कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

Next

मुंबई :  राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टिंग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या आहेत. 

कोविड संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबाबत  चिंता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त,  जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला. 

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे,  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह टास्कफोर्स चे अध्यक्ष डॉ संजय ओक, सदस्य शशांक जोशी डॉ राहुल पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

'कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घेणे आवश्यक'
कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणु जन्माला येत आहेत. चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनकूल वर्तणूक अंगिकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

'कायदा व सुव्यवस्था चोख राखा'
राज्यातील सर्व महसूल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी हे प्रत्यक्ष लढणारे सैनिक असून राज्याच्या विकासाचा पाठकणा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, या यंत्रणेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने दक्ष राहण्याचे निर्देशही यावेळी दिले.

'लसीकरण सक्तीचे करा, केंद्र शासनाकडे मागणी करणार'
आपण केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देतांना ९ महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.   १८ ते ५९ या वयोगटातील  नागरिकांना शासकीय रुग्णालयातून बुस्टर डोस देण्याबाबतचा शासन विचार करत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पावसाळापूर्व कामांचाही आढावा घेतला यात सागरतटीय जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्यसंस्थांमधील फायर ऑडिटचे काम ही पूर्णत्वाला न्यावे - राजेश टोपे
राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी टेस्टिंग वाढवण्याची गरज असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिल्या. त्यांनी जनजागृती मोहीम पुन्हा एकदा नव्याने राबवावी, राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्याचे काम वरचढ राहील यादृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, आरोग्य संस्थांमधील सर्व सयंत्रांची देखभाल दुरुस्ती करतांना फायर ऑडिटचे काम ही पूर्णत्वाला न्यावे असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Web Title: Stop the fourth wave of corona on the threshold, Chief Minister Uddhav Thackeray's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.