मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - उच्च न्यायालय
By Admin | Updated: May 4, 2017 15:37 IST2017-05-04T15:32:34+5:302017-05-04T15:37:00+5:30
संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.

मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - उच्च न्यायालय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील बेकायदेशीर पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचे पुरावे उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आले. याचबरोबर हा बाजार आता कुर्ला आणि बोरिवली परिसरातही होत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे आता फक्त क्रॉफर्ड मार्केटच नाही, तर संपूर्ण मुंबईत होणा-या बेकायदेशीर पशू- पक्षांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रॉफर्ड मार्केटमध्ये पशू- पक्षांची बेकायदेशीरपणे विक्री करणारी अनेक दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. प्राण्यांच्या विक्रीला बंदी घालण्याच्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी जनहित याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना पशू- पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयाने ही विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचा अहवाल उच्च न्यायालयाने यासंदर्भात बनविलेल्या समितीने न्यायालयापुढे सादर केला. या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने सांगितले की, बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री पुन्हा सुरु होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी काळजी घ्यावी. तसेच, यावर उद्यापर्यंत पालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.