अंबाजोगाईतील अवैध उत्खनन थांबवले
By Admin | Updated: January 28, 2017 03:43 IST2017-01-28T03:43:13+5:302017-01-28T03:43:13+5:30
शहरालगत असलेल्या बाराखांबी (सकलेश्वर) मंदिर परिसरात जेसीबीने अवैधपणे करण्यात येत असलेले उत्खनन अखेर थांबविण्यात आले

अंबाजोगाईतील अवैध उत्खनन थांबवले
अंबाजोगाई (जि. बीड) /औरंगाबाद: शहरालगत असलेल्या बाराखांबी (सकलेश्वर) मंदिर परिसरात जेसीबीने अवैधपणे करण्यात येत असलेले उत्खनन अखेर थांबविण्यात आले. जेसीबीने केलेल्या खोदकामामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मूर्ती जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अंबाजोगाई शहराजवळ ११व्या शतकातील चालुक्यकालिन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले बाराखांबी मंदिर आहे. या मंदिर परिसरात स्वच्छता करण्याच्या बहाण्याने चार महिन्यांपासून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासाठी जेसीबीचाही वापर करण्यात आला. या उत्खननात अनेक प्राचीन मूर्ती सापडल्या.
राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक अजित खंदारे, अभियंता प्रकाश रोकडे, सय्यद अन्सारी, तंत्रशाखाप्रमुख श्रीमीत मार्कंडेय यांनी गुरुवारी या मंदिराला भेट दिली.
या परिसरात तीन मंदिरे असावीत असा अंदाजही पथकाने व्यक्त केला. हे उत्खनन बेकायदेशीर असून आगामी काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेण्याचे त्यांनी संबंधितांना बजावले आहे. (प्रतिनिधी)