स्मशानातील राखेवर पोट
By Admin | Updated: November 29, 2015 01:53 IST2015-11-29T01:53:59+5:302015-11-29T01:53:59+5:30
स्मशानात प्रेतासोबत अर्धवट जळालेली लाकडे, नदीपात्रात विसर्जित अस्ती व राखेतून सोने-चांदी, किडूकमिडूक, जोडवे यावर झारेकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो़.

स्मशानातील राखेवर पोट
- पंडित भारुड, संवत्सर
स्मशानात प्रेतासोबत अर्धवट जळालेली लाकडे, नदीपात्रात विसर्जित अस्ती व राखेतून सोने-चांदी, किडूकमिडूक, जोडवे यावर झारेकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो़
नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गोदावरी नदीत गेल्या तीन पिढ्यांपासून झारेकरी काम करीत आहेत़ ६५ वर्षीय वृद्ध झारेकरी भीमराव सुखदेव जगधने, शकुंतला जगधने, भीमबाई यादवराव सोळसे, विमलबाई नाना थोरात, मीराबाई वसंत मरसाळे, सावित्री सुभाष आहेर व त्यांच्या छोट्या मुलांसमवेत ही झारेकरी मंडळी आपल्या दु:खाची कहाणी सांगत होत्या़
‘पूर्वापार आमचे हेच काम आहे़ नदीपात्रात पाणी असो अगर नसो़ पात्रातील वाळूतून स्मशनातील अर्धवट जळालेली लागडे, बाबूंचे तुकडे, अस्ती, राख नदीपात्रात विसर्जित केल्यानंतर वाळूत शोधून त्या सोन्यातून, चांदीतून दररोजचे कधी २०० तर कधी पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळते़ सोने-चांदी विकून आमचा उदरनिर्वाह चालतो़ त्याच अर्धवट जळालेल्या लाकडावर अन्न शिजवायचे़ हे अन्न खाऊन झारेकरी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत काम करतात़ स्मशानातील वाळूतले सोने-पैसे, जोडवे, गरे, कुंडकं, मणी शोधण्यासाठी पाण्यातून वाळू उपसण्याचा एकच क्रम. कधी एवढी वाळू उपसून, चाळून घाम निघतो, पण चहा-पाण्याइतके देखील पैसे मिळत नाहीत. कोपरगावमध्ये जवळपास दहा ते बारा जण हे काम करतात़ त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे़ रेशनकार्ड मिळावे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून मदत मिळावी,’ अशी त्यांची मागणी आहे़
वृद्ध भीमराव जगधने पाण्यात उघडे होऊन डुबकी मारतात़ पाणी शांत होते़ काही वेळ पाण्यात श्वास रोखतात़ हातात घमेले घेऊन वर येतात़ घमेल्यात केवळ वाळूच असते़ ती चाळून पाहतात, पण काहीच नाही़ पुन्हा तोच प्रयत्ऩ
उपासमारीची वेळ : ‘छोटी मुलेही आमच्याबरोबर असतात़ त्यामुळे त्यांना शिक्षण कोठून द्यायचे, या व्यवसायात आता ‘राम’ राहिला नाही़ असे भीमराव जगधने सांगतात़ श्रीमंत लोक अस्ती विसर्जनासाठी नाशिकला जातात़, तर मध्यमवर्गीय सोने-नाणे काहीच ठेवत नाही़ आता लोक सुट्टे पैसेदेखील नदीपात्रात टाकत नाहीत़ म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ येते,’ असे ते म्हणाले़