मोजके पदार्थ, मोजका थाटमाट
By Admin | Updated: November 29, 2015 01:59 IST2015-11-29T01:59:19+5:302015-11-29T01:59:19+5:30
आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये
मोजके पदार्थ, मोजका थाटमाट
- विजयकुमार सैतवाल, जळगाव
आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये तर खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते, त्यामुळे अन्न वाया जाते. हे टाळण्यासाठी जळगावातील सकल जैन समाजासाठी आदर्श नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मोजकेच खाद्यपदार्थ करण्यासह थाटमाटालाही आवर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरा मुलगा अथवा नवरी मुलगी यांची हौसमौस व्हावी, तसेच सुबत्तेचे दर्शन घडविण्यासाठी विवाह समारंभात मोठा खर्च करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. मात्र, जळगावातील सकल जैन समाजाने पुढाकार घेत, अनावश्यक खर्चाला पायबंद घालण्यासाठी एक नियमावलीच तयार केली. समाजबांधवांची बैठक होऊन त्यात सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात खाद्यपदार्थ मर्यादित ठेवण्यावर एकमत झाले.
समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी श्रीमंतांनी काटकसर केल्यास वावगे नाही, स्वत:पासूनच परिवर्तनाचे पाऊल उचलण्याचे आवाहन अशोक जैन यांनी केले.
यथोचित सत्कार होणार
सकल जैन बांधवांच्या घरोघरी नियमावली पाठविण्यात येणार असून, लग्नसमारंभ अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात त्याचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवाढव्य खर्च करणाऱ्यांच्या लग्नाला जायचे. मात्र, न जेवताच परत यायचे, असा विचार ठेवण्यात आला आहे.
अहिंसा तत्त्व पाळा
जैन समाजात अहिंसेला मोठे स्थान आहे. रात्रीचे समारंभ बंद करण्याचाही विचार मांडण्यात आला. रात्री मोठ्या दिव्यांमुळे कीडे-किटक यांचा मृत्यू होऊ शकतो. आपले पूर्वज रात्री जेवत नव्हते, याचीही जाणीव या निमित्ताने करून देण्यात येणार आहे.
पदार्थांची संख्या मर्यादित
सामूहिक भोजन व विवाह कार्यक्रमात नाष्ट्यासाठी नऊ, भोजनात २१, कुंकुममध्ये ३ तर धार्मिक व सामाजिक भोजनात १० पदार्थ असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पाच सदस्यांची समिती
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती तयार केली होती. त्यात दिलीप गांधी, अजय ललवाणी, अनिल देसर्डा, महेंद्र जैन, प्रदीप मुथा यांचा समावेश होता. त्यांनी नियमावली तयार करून बैठकीत मांडली.
लग्न समारंभात अन्न वाया जाते. ते भुकेल्यांना मिळावे, तसेच इतर गोष्टींवर करण्यात येणारा अनाठायी खर्चाला आळा बसला पाहिजे. यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- दलुभाऊ जैन, सकल जैन समाज समाज संघपती, जळगाव