स्टेथोस्कोप थांबतोय खिशावर!---डॉक्टर तुम्हीसुद्धा :
By Admin | Updated: November 28, 2014 23:50 IST2014-11-28T22:28:22+5:302014-11-28T23:50:58+5:30
‘कट प्रॅक्टिस’ : चाळीस टक्के वैद्यकीय व्यवसायाला वाळवी-

स्टेथोस्कोप थांबतोय खिशावर!---डॉक्टर तुम्हीसुद्धा :
सातारा : कधीकाळी देवासमान वाटणाऱ्या डॉक्टरांचा नुसता स्पर्श लाभला तरी रुग्णाचा ताप पळून जायचा; परंतु आज याच रुग्णाचे नातेवाईक हातात दगड घेऊन दवाखान्याची काच फोडायला त्वेषानं पुढे सरसावतायत. एकेकाळचा ‘देव’ आज समाजासाठी ‘कसाई’ कसा बनला? भुर्इंजच्या सरकारी डॉक्टरानं पेशंटच्या बदल्यात मागितलेल्या दलालीमुळं ‘मेडिकल लाइन’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. मूठभर दलालांमुळं सातारचं पवित्र वैद्यकीय क्षेत्र बदनाम होऊ पाहतंय. म्हणूनच ‘लोकमत टीम’नं या क्षेत्रातल्या चांगल्या-वाईट घडामोडींचा ‘ईसीजी’ घेऊन केलीय भल्याबुऱ्या व्यवहारांची ‘शस्त्रक्रिया’.
‘रेफरल चार्जेस’ म्हणजेच रुग्णाला पाठविण्याच्या मोबदल्यात पैसे घेण्याची अनिष्ट परंपरा ‘कट प्रॅक्टिस’ म्हणून ओळखली जाते. सातारच्या वैद्यकीय क्षेत्रात डोकावल्यास हे छुपे व्यवहार महानगरांच्या तुलनेत कमी दिसत असले, तरी ते हळूहळू वाढत चालले आहेत. ‘कट प्रॅक्टिस’ केल्याशिवाय आपण ‘एस्टॅब्लिश’ होऊच शकणार नाही, अशी ‘खात्री’ काही नव्या डॉक्टरांना होऊ लागलीय म्हणे! त्यामुळं असे व्यवहार न करणाऱ्याला ते वेड्यात काढतात.
पूर्वी जिल्हा रुग्णालयात औषध आणि सुविधा नसल्यामुळे तेथील डॉक्टरांवर असे दोषारोप सर्रास होत असत. नंतर ‘नो प्रिस्क्रिप्शन’ हा नियम बनवून भरपूर औषधसाठा उपलब्ध करून दिल्यामुळं हे आरोप कमी झाले; पण संपले नाहीत. याखेरीज अपघातग्रस्ताला रुग्णालयात आणून पोहोचविणाऱ्या रिक्षावाल्याला पाचशे रुपये देणारे महाभागही साताऱ्याने पाहिलेत.
‘कॅज्युअल्टी घेऊन या,’ अशी आॅफरच काही रिक्षावाल्यांना दिली गेली होती. गंभीर विशेषत: हृदयविकारग्रस्त रुग्णाला पुण्याला ‘रेफर’ करताना काही डॉक्टरांना ‘दक्षिणा’ मिळत असे; पण हल्ली सर्व अत्याधुनिक सुविधा साताऱ्यात उपलब्ध झाल्यामुळं हे प्रमाण कमी झालंय.
अजूनही सातारचं साठ ते सत्तर टक्के वैद्यकीय क्षेत्र या गैरव्यवहारांपासून दूर आहे, असं सांगितलं जातं. उच्च मध्यमवर्गीय मंडळी ‘हेल्थ कॉन्शस’ झाली असल्यामुळं ‘संपूर्ण चेक-अप’ करवून घेण्याची क्रेझ आहे. त्यासाठी बहुस्तरीय विपणन प्रणालीचा (एमएलएम) वापर केला जात असल्यामुळं ते कमाईचं हक्काचं साधन काहीजणांना उघडपणे
मिळालंय. (प्रतिनिधी)
कमावणाऱ्यांचं तर्कशास्त्र
‘आजकाल कुठं चेन नाही? आपलीच चेन का नसावी?’ असे प्रश्न उपस्थित करून काही डॉक्टर आपापसात बोलताना ‘कट प्रॅक्टिस’चं समर्थन करताना दिसतात. ठेकेदार लोकप्रतिनिधीला, प्लायवूडवाला सुताराला, आर्किटेक्टला टक्केवारी देत असेल, तर डॉक्टरांनी ती घेतली म्हणून बिघडलं कुठं, असं तर्कशास्त्र ही मंडळी लढवतात.
अशी होते सुरुवात
लाखो रुपये खर्चून मोठ्ठं हॉस्पिटल बांधल्यावर पेशंटची गर्दी हवीच. त्यासाठी परिसरातील ‘जनरल प्रॅक्टिशनर’ना एखादी पार्टी दिली जाते. तिथं ‘रेफरल चार्जेस’बद्दल खुली चर्चा केली जाते आणि ही प्रथा सुरू होते. काही जणांनी अशी ‘बोलणी’ करण्यासाठी खास जनसंपर्क अधिकारीही नेमले असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळालीय.
वाईटातून चांगल्याचा जन्म
रुग्णाला विशिष्ट रुग्णालयात पाठविल्यास आपल्या नावचं ‘पाकीट’ तयार करणारच, याची खात्री पटलेल्या; परंतु अशा प्रकारांना विरोध असलेल्या डॉक्टरांनी आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘आम्हाला जे देणार तितकी सूट संबंधित रुग्णाला द्या,’ अशा सूचना काही डॉक्टरांनी देऊन ठेवल्या आहेत. अनिष्ट प्रथेतून रुग्णाला दिलासा देणाऱ्या चांगल्या प्रथेचा जन्म झालाय.
तीन क्षेत्रे बदनाम
कट प्रॅक्टिसचे दोषारोप (उघडपणे नव्हे) सर्वाधिक केले जातात ते पॅथॉलॉजी, सर्जिकल आणि मल्टी स्पेशालिटी या तीन क्षेत्रांवर. सर्जिकल क्षेत्रात ‘रेफरन्स’खेरीज रुग्ण जाऊच शकत नाही. पॅथॉलॉजीच्या बाबतीत होणारे आरोप टाळण्यासाठी हल्ली काही डॉक्टर फक्त तपासणीचा कागद देऊन ‘सोयीचे वाटेल त्या लॅबमध्ये तपासणी करा,’ असं सांगू लागलेत.
सव्य-अपसव्य कशासाठी?
वैद्यकीय शिक्षणासाठी झालेला वारेमाप खर्च भरून काढण्यासाठी
चकाचक रुग्णालयाच्या उभारणीच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी
डॉक्टर म्हणून मानानं जगताना ‘लाइफस्टाइल मेन्टेन’ करण्यासाठी
नवागत डॉक्टरांच्या दृष्टीनं स्पर्धेत टिकून वेगानं पुढे जाण्यासाठी