एसटीच्या छतावरील स्टेपनी आता चेसीला
By Admin | Updated: September 7, 2016 18:02 IST2016-09-07T18:02:59+5:302016-09-07T18:02:59+5:30
एसटी महामंडळातर्फे नव्या बसगाड्यांमध्ये करण्यात आलेले महत्वपूर्ण बदल समोर येत आहेत.

एसटीच्या छतावरील स्टेपनी आता चेसीला
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 7 - एसटी महामंडळातर्फे नव्या बसगाड्यांमध्ये करण्यात आलेले महत्वपूर्ण बदल समोर येत आहेत. जुन्या एसटीच्या टपावर हमखास स्टेपनी (अतिरिक्त टायर) दिसते. परंतु यापुढे नव्या एसटीच्या टपावर हे चित्र दिसणार नाही. चालक-वाहकांच्या सुविधेसाठी आणि अपघात टाळण्याच्या दृष्टीने नव्या बसगाड्यांच्या चेसीला स्टेपनी लावण्याची सुविधा देण्यात आली आहे.
सर्वसामान्यांसाठी एस. टी. प्रमुख वाहतूक सुविधा आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एस. टी. साठी जिव्हाळा कायम आहे. ग्रामीण भागातील प्रवासी असो की विद्यार्थी, त्यांना एस. टी. हाच एकमेव आधार आहे. शहरी भागांसह खेडोपाडी, डोंगराळ आणि दुर्गम भागातही एस. टी.ची अविरतपणे सेवा सुरू आहे. प्रवासादरम्यान एसटीचे टायर पंक्चर झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्टेपनीची सुविधा दिली जाते.
जुन्या बसगाड्यांच्या छतावरील कॅरिअरमध्ये ही स्टेपनी ठेवलेली दिसते. अनेकदा ही स्टेपनी योग्य पद्धतीने ठेवली जात नाही. त्यातून प्रवासादरम्यान एसटीच्या छतावरील स्टेपनी अचानक पडल्यामुळे अपघात घडल्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. शिवाय टायर पंक्चर झाल्यावर छतावरून स्टेपनी खाली उतरविणे आणि पुन्हा वर ठेवणे चालक-वाहकांसाठी खूप त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक कर्मचारी थेट बसमध्येच स्टेपनी ठेवण्यावर भर देतात. त्यातूनही अपघातास आमंत्रण मिळते. या सर्व गोष्टींचा नव्या बसेस बांधताना विचार करण्यात आला आहे.
नव्या बसगाड्यांची बांधणी करताना छतावरील कॅरिअर काढून टाकण्यात येत आहे. अशा परिस्थितीत स्टेपनीसाठी चेसीखाली जागा करण्यात आली आहे. त्यामुळे छतावरून स्टेपनी काढण्याच्या त्रासापासून चालक-वाहकांची सुटका होण्यास मदत होत आहे. शिवाय किमान नव्या बसगाड्यांच्या छतावरून स्टेपनी पडून अपघात झाल्याच्या घटना यापुढे होणार नाही.