चिमुरडीच्या मृत्यू प्रकरणी सावत्र आईला अटक
By Admin | Updated: August 1, 2016 02:11 IST2016-08-01T02:11:11+5:302016-08-01T02:11:11+5:30
अॅन्टॉप हिल परिसरातील बंगालीपुरा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता.

चिमुरडीच्या मृत्यू प्रकरणी सावत्र आईला अटक
मुंबई: अॅन्टॉप हिल परिसरातील बंगालीपुरा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी अॅन्टॉप हिल पोलिसांनी मुलीच्या सावत्र आईवर गुन्हा दाखल करत आज तिला अटक केली आहे.
मयत मुलीची आई काही दिवसांपूर्वीच तिला सोडून गेल्याने तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यामुळे ही मुलगी देखील तिची सावत्र आई रजिया रसुल शेख (२४) हिच्यासोबतच राहत होती. शुक्रवारी मुलगी घरात खेळत असताना तिच्या आईने रागाच्या भरात तिला मारहाण केली.
या दरम्यान धक्का लागून ही मुलगी जमिनीवर आपटली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात
आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
अॅन्टॉप हिल पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पहिल्यांदा एडिआर दाखल केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ रजियाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आहे. (प्रतिनिधी)