सावत्र आईने मुलीला साडेसहा लाखांना विकले

By Admin | Updated: July 25, 2016 04:59 IST2016-07-25T04:59:05+5:302016-07-25T04:59:05+5:30

राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली

The step mother has sold the girl to 3.5 million | सावत्र आईने मुलीला साडेसहा लाखांना विकले

सावत्र आईने मुलीला साडेसहा लाखांना विकले

वसई : राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली. तिने याच मुलीला दोन वेळा विकले होते. तर तिच्या कथित नवऱ्याने तिला १५ लाखांना पुण्यात विकण्याची तयारी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे. मुख्य आरोपी असलेली आई आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून देणाऱ्या वकिलाला पकडण्यासाठी तुळींज पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे.
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राणी क्षेत्रात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा कथित विवाह तिची सावत्र आई शांती देवीने देसुरीपाल गावात राहणाऱ्या लक्षाराम चौधरी (३५) याच्याशी ९ आॅगस्ट २०१५ रोजी लावला होता. त्यासाठी तिने त्याच्याकडून साडे सहा लाख रुपये घेतले होते. त्या वेळी तिचे वय १४ वर्षे असताना शांती देवीने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून ते २० वर्षे दाखवले होते. लक्षाराम चौधरी या मुलीला नालासोपाऱ्यातील संतोषभुवन, वलईपाडा येथील आपल्या घरी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने तिला कोंडून तिच्यावर अमानुष अत्याचार केले तसेच मारहाणही केली. शुक्रवारी सायंकाळी तिने सुटका करून घेत तुळींज पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी लक्षाराम चौधरीला अटक केली आहे. तर सावत्र आई शांतादेवी आणि नोटरी करणाऱ्या वकिलासह अन्य काही जणांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The step mother has sold the girl to 3.5 million