Nitesh Rane Nagarparishad Nagarpanchayat Election Result: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा धुराळा शांत झाला असला तरी, राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. निवडणुकीच्या निकालांनंतर राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट केली असून, यामुळे कोकणच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी सकाळी केलेल्या एका सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निकालांनंतर अवघ्या २४ तासांत नितेश राणे यांनी म्हटले की, "गप्प होतो.. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे!" या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणेंचा हा रोख नेमका कोणाकडे आहे? महायुतीतील नेत्यांकडे की स्वतःचे बंधू नीलेश राणेंकडे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कणकवली-मालवणच्या निकालाने गणितं बिघडली?
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मालवणमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर मात करत १० जागा जिंकल्या. तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. सर्वात धक्कादायक निकाल कणकवलीत लागला, जिथे भाजपचे ९ उमेदवार निवडून आले असूनही, नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी बाजी मारली. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना मिळालेला हा धक्का त्यांच्या या संतप्त प्रतिक्रियेचे मुख्य कारण मानले जात आहे.
"नारायण राणे साहेबांना बाजूला सारले"; नीलेश राणे यांचा पलटवार
विजयानंतर नीलेश राणे यांनी नितेश यांच्या ट्विटवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले असले, तरी त्यांनी भाजपच्या स्थानिक धोरणांवर सडकून टीका केली. "नारायण राणे साहेबांना काही लोकांनी या प्रक्रियेतून बाजूला सारले, म्हणून हा संघर्ष झाला. ही पक्षाची नाही तर काही लोकांची चूक होती," असे म्हणत त्यांनी भाजपमधील काही नेत्यांकडे बोट दाखवले. तसेच, निवडणूक प्रचारादरम्यान नीलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याची कॅश बॅग पकडून जे स्टिंग ऑपरेशन केले होते, त्यावरूनही राजकारण तापलं होतं.
पुढचा अंक काय असणार?
निवडणूक काळात शांत राहिलेले नितेश राणे आता मौन सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दिलेला गौप्यस्फोटाचा इशारा सिंधुदुर्गातील महायुतीचे समीकरण बदलणारा ठरू शकतो. नारायण राणे यांना बाजूला सारणारे ते काही लोक नेमके कोण आहेत आणि नितेश राणे आपल्याच पक्षातील नेत्यांवर तोफ डागणार की नीलेश राणेंना उत्तर देणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Nitesh Rane's cryptic post-election tweet hints at a political storm in Sindhudurg, questioning unspoken truths. The Kankavli result, a setback in his stronghold, and internal BJP conflicts, fuel speculation about his next move within the Mahayuti alliance.
Web Summary : नितेश राणे के चुनाव बाद किए गए रहस्यमय ट्वीट ने सिंधुदुर्ग में राजनीतिक तूफान का संकेत दिया है, जिसमें अनकही सच्चाइयों पर सवाल उठाए गए हैं। कणकवली के नतीजे, उनके गढ़ में एक झटका, और भाजपा के आंतरिक संघर्ष, महायुति गठबंधन के भीतर उनके अगले कदम के बारे में अटकलों को हवा दे रहे हैं।