राज्याचे पोलीस दल लोकाभिमुख करणार

By Admin | Updated: October 1, 2015 03:10 IST2015-10-01T03:10:34+5:302015-10-01T03:10:34+5:30

गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल

The state's police forces are people oriented | राज्याचे पोलीस दल लोकाभिमुख करणार

राज्याचे पोलीस दल लोकाभिमुख करणार

मुंबई : गुन्ह्याच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच राज्यातील महिला, मुले, जेष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, अनुसुुचित जाती व जमातीच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याला आपले प्राधान्य असेल, असे प्रतिपादन राज्याचे नूतन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी बुधवारी केले. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी राज्यभर ‘पोलीस मित्र’सारखी संकल्पना राबवून पोलिस दल लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेही दीक्षित यांनी म्हटले आहे.
मावळते पोलीसप्रमुख संंजीव दयाल यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,‘महाराष्ट्र पोलीस हे देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्याचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारताना मला जबाबदारीची जाणीव आहे.
संजीव दयाल यांनी गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले, आपलाही त्यावर भर राहणार असून त्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक उपायांचा वापर अधिकाधिक केला जाईल. तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अवगत करता आले पाहिजे. असे सांगून दीक्षित म्हणाले,‘नागरिकांनी आपला ऐवज,मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरुक राहून पोलिसांना सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. त्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना खूप उपयुक्त ठरत आहे. नागपूरला आयुक्त म्हणून कार्यरत असताना ती यशस्वी ठरली होती,आता राज्यभर त्याची व्याप्ती वाढविली जाईल, त्यातून रस्त्यावरील गुन्ह्यांच्या अटकावाबरोबरच दहशतवादी कारवायांवरही प्रतिबंध घालणे शक्य आहे.
त्याचप्रमाणे महिला, मुले, जेष्ठ नागरिक व अल्पसंख्याक समाजाच्या हक्क व संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल. राज्यातील औद्योगिकरण वाढविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांंना पूरक वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल. सव्वा दोन लाखांवर पोलिसांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)
----------
‘सनातन’बाबत अधिक
माहिती घेऊन कारवाई
सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता दीक्षित म्हणाले,‘यापूर्वीच्या प्रस्तावाला चार वर्षांचा अवधी झाला आहे. त्यानंतर संस्थेची कार्यपद्धती कशी राहिली आहे, याची माहिती घेवून त्यांच्यावर बंदीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून आता त्याबाबत अधिक बोलणे उचित नाही.डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून सुरु असून त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य पोलिसांकडून पुरविले जाईल.

Web Title: The state's police forces are people oriented