राज्यातील उद्योग कर्नाटकात जाऊ देणार नाही
By Admin | Updated: February 12, 2015 00:35 IST2015-02-11T22:38:40+5:302015-02-12T00:35:04+5:30
सुभाष देसाई : सांगलीत शिवसेनेतर्फे नागरी सत्कार

राज्यातील उद्योग कर्नाटकात जाऊ देणार नाही
सांगली : महाराष्ट्रात उद्योग-व्यवसायास चांगले वातावरण असून, यापूर्वीच्या मंत्र्यांकडे इच्छाशक्ती नसल्याने काही उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतराचा निर्णय घेतला होता. परंतु आम्ही उद्योग क्षेत्राला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर नेणार असून, भविष्यकाळात राज्यातील एकही उद्योग गैरसोयींअभावी कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचे मत उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज, बुधवारी व्यक्त केले.येथील मारुती चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पक्षाचे उपनेते संजय बानुगडे-पाटील यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले होते. सत्कारास उत्तर देताना देसाई बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संभाजी पवार, पृथ्वीराज पवार, जिल्हाप्रमुख आनंद पवार, विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाल्याने सरकार स्थिर झाले आहे. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. कारखान्यांसाठी राज्यातील काहींनी जमिनी घेतल्या आहेत. परंतु त्याचा काहीही वापर केलेला नाही. सरकारतर्फे आम्ही त्या पडून असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांचे फेरवाटप करण्याचे निश्चित केले आहे. सांगलीतील औद्योगिक वसाहतीची पाहणी केली असता, तेथील रस्त्यांची दुरवस्था नजरेत आली. येथील मंत्री इतर कामात मश्गुल असल्यानेच ही वेळ आली आहे. आज रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ केला आहे. रस्ते दर्जेदारच झाले पाहिजेत, अशा सूचना ठेकेदारांना दिलेल्या आहेत. भविष्यात सर्वच औद्योगिक वसाहतीतील रस्ते उत्तम झालेले दिसतील. शिवसेनेची बांधणी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली असल्याने भविष्यात राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून शिवसेना उदयास येईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले की, जनसामान्यांचे प्रश्न मांडणारी सेना सत्तेत आल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे अधिकाधिक निधी मिळेल.
यावेळी पृथ्वीराज पवार यांनी, भविष्यात सांगली हे देशाचे रोल मॉडेल होईल, यासाठी उद्योगमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शहरप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी स्वागत केले. अजिंक्य पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)