राज्यमंत्र्यांच्या विधानावरून गदारोळ
By Admin | Updated: April 8, 2016 02:46 IST2016-04-08T02:46:07+5:302016-04-08T02:46:07+5:30
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त

राज्यमंत्र्यांच्या विधानावरून गदारोळ
मुंबई : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने तब्बल सहा वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले.
गुरुवारी दुपारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील खंडूबाबा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. यावर बोलताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, मुलींची शाळेतून गळती होऊ नये यासाठी महिना साठप्रमाणे दहा महिन्यांसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. संबंधित शाळेतील काही मुलींनी शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली होती. २००९ ते २०१३ या काळातील हा प्रकार आहे. याचा तपास केला असता केवळ ९०० रुपयांचा हा प्रकार असल्याचे आढळून आले. ९०० रुपये संस्थेकडेच पडून होते आणि त्यात कसलीच अफरातफर झाली नसल्याचे स्पष्ट केले. एकीकडे मागासवर्गीय शाळा चालत नसल्याची तक्रार विरोधकांकडून होते, तर दुसरीकडे चांगल्या शाळेला मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सरकार असे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर विरोधी बाकावर बसलेल्या काही सदस्यांनी आव्हानात्मक टिप्पणी केली. त्यावर राज्यमंत्र्यांनी थेट इशारा देत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधी बाकांवरून विशेषत: राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आजचा दिवस सभागृहासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. सभागृहाची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार जपणे आवश्यक आहे. राज्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे, हे असेच चालू राहिले तर उद्या विरोधी सदस्यांना प्रश्न विचारणेही अशक्य होईल.
>सभापती नाईक-निंबाळकर यांनीही राज्यमंत्र्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. दिलीप कांबळे यांना मी चांगला ओळखतो. ते आज इतके भावनिक का झाले आणि त्यांनी हे विधान कसे केले याबद्दल मलाही आश्चर्य वाटते. त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, असे सभापती म्हणाले.
शेवटी सायंकाळी चार वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. असा प्रकार घडायला नको होता. हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी संयम बाळगायला हवा.
भावनेच्या भरात, उद्वेगामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. सर्व सदस्यांना आणि सहकारी मंत्र्यांना याबाबत दक्षता घेण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. खडसे यांच्या दिलगिरीनंतर सभागृहाच्या पुढील कामकाजास सुरुवात झाली.