राज्याला निवडणुका परवडणार नाहीत
By Admin | Updated: October 16, 2015 01:54 IST2015-10-16T01:54:25+5:302015-10-16T01:54:25+5:30
भाजप-सेनेने सामंजस्याने घ्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला.

राज्याला निवडणुका परवडणार नाहीत
बुलडाणा: शिवसेना व भाजपमध्ये सध्या वाद सुरू असून, सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरोखरीच घेतल्यास सरकार पडेल व वर्षभरात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. सरकार स्थापन होऊन उणेपुरे वर्षही झाले नसल्याने, राज्याला कोणत्याही परिस्थीतीत निवडणुका परवडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून ही भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.आठवले बुलडाणा येथे रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठींबा देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली असल्याचे स्मरण आठवले यांनी यावेळी करून दिले. इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला होता, हे खरे असले तरी, या मुद्यावर रिपाइंने आक्रमक भूमिका घेतली नसती, तर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नसता, हेही तेवढेच खरे आहे. या मुद्यावर श्रेय लाटण्याची रिपाइंला गरज नाही. ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी खुशाल घ्यावे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंला सत्तेत १0 टक्के वाटा देण्याचे भाजपने आम्हाला लेखी दिले होते. प्रत्यक्षात किमान ५ टक्के तरी वाटा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी काही महामंडळांची मागणी यावेळी केली. सामाजिक मागासलेपणावर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण कुणीही हिंरावून घेवू शकत नाही. स्वत: पंतप्रधानांनीसुध्दा हिच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, असे आठवले म्हणाले.